लडाखमध्ये लष्कराचे वाहन नदीत कोसळून ७ जवानांना वीरमरण; खटाव तालुक्यातील विसापूरचे सुपुत्र सुभेदार विजय शिंदे यांचाही मृतांत समावेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२२ । पुसेगाव । लडाख प्रदेशात 26 सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. त्यामध्ये विसापूर ता. खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचा समावेश आहे. देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. या घटनेमुळे विसापूरसह खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.

विजय सर्जेराव शिंदे हे सन 1998 मध्ये 22 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. 24 वर्षाच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचे संरक्षण केले. विसापूर गावाला सैनिकी परंपरा आहे. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे लष्करात होते. तर मोठे बंधू प्रमोद शिंदे हे लष्करात पॅरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत.

सध्या विजय शिंदे यांचे पोस्टिंग लेह लडाख येथे होते. लष्करात ते सभेदार या पदावर कार्यरत होते. 26 जवानांचे परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास पडले. या अपघातात सात सैनिकांचा मृत्यू झाला आणि सोळा जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्याच अपघातात सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले.

विजय शिंदे यांचे पार्थिव रविवार दि. 29 मे रोजी विसापूर ता. खटाव येथे आणले जाणार आहे. तिथेच शासकीय इतमामात त्यांच्यावर ती अंत्यसंस्कार होणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!