उंब्रज परिसरातील दोन टोळ्यांतील 7 जण तडीपार पोलिस अधीक्षकांचा दणका 


 

स्थैर्य, सातारा, दि.१८: उंब्रज व परिसरात गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून व त्यांना उपद्रवी ठरणार्‍या दोन टोळ्यांना पोलिस अधीक्षकांनी दणका दिला आहे. या दोन टोळ्यांमधील 7 जणांना तडपार करण्याचे आदेश हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिले आहेत. 

याबाबत माहिती अशी, उंब्रज व पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, मोठी दुखापत, दरोडा, गर्दी मारामारी करणार्‍या टोळीचा प्रमुख संदीप भानुदास भिंताडे वय 25 रा. जाळगेवाडी, ता. पाटण, जि. सातारा सागर बंडा शंकर गायकवाड, वय 27 वर्षे (टोळी सदस्य) रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा, सोन्या उर्फ शाहीद शब्बीर मुल्ला, वय 22 वर्षे, रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा, रोशन उर्फ रोश्या अरविंद सोनावले वय -21 रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा यांची टोळी तयार झाली होती. ते टोळीने गुन्हे करीत होते. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करुनही व यापुर्वी 2019 मध्ये सहा महीने सातारा जिल्ह्यातून हद्दपार करूनही हद्दपार कालावधी संपताच त्यांनी पुन्हा दोन गंभीर गुन्हे करुन समाजात दहशत, भितीचे वातावरण निर्माण केले होते. कारवाई करुनही त्यांच्या बेकायदेशीर हालचालीस प्रतिबंध झालेला नाही. त्यामुळे या टोळीतील चौघांना पुर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातून एक वर्षा करीता हद्दपारीचा आदेश केला आहे. 

उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, खंडणी, विनयभंग, दुखापत मारामारी, जळीत, शिवीगाळ, दमदाटी करणार्‍या टोळीचा प्रमुख रणजित नथुराम सरगर वय 23 रा. वाघेश्‍वर, ता. कराड, अक्षय उर्फ आप्पा अंकुश लोखंडे वय 24 वर्ष रा. संजयनगर मसुर, ता. कराड व धिरज रघुनाथ जाधव वय 30 वर्षे, रा. वाघेश्‍वर, मसुर, ता. कराड यांना सुधारण्याची संधी देवूनही व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. या टोळीतील तीनजणांना पुर्ण सातारा जिल्हयातून सहा महिन्यांकरीता हद्दपारीचा आदेश केला आहे.

वरील सातही जणांना हद्दपार करण्याची जनतेमधून मागणी होत होती. त्यांच्याकडून कराड व पाटण, सातारा, तालुका व सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये, म्हणून दोन्ही टोळी मधील सातजणांना हद्दपार करण्याबाबत उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अजय कुमार बंसल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर चौकशी व सुनावणी होवून दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून अजयकुमार बन्सल यांनी आदेश दिले आहेत. सुनावणी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार मधुकर गुरव यांनी योग्य ते पुरावे सादर केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!