स्थैर्य, मुंबई, दि.२३: नव्या अनलॉकच्या नियमांसह भारत सरकार शाळा पुन्हा उघडण्याच्या तयारीत असताना, भारतातील ब्रेनलीच्या बहुतांश म्हणजे ६२% विद्यार्थ्यांना शाळा सुरु करण्याचे हे नवे नियम मान्य आहे, असे ब्रेनलीच्या ताज्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. हे सर्वेक्षण ३,३९७ सहभागींच्या विद्यार्थ्यांवर आधारीत असून या वर्षी शाळा उघडण्यासंबंधीच्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांचे काय मत आहे, याविषयी एक अंतर्दृष्टी प्रदान करतो.
भारतीय विद्यार्थ्यांपैकी २१.१% विद्यार्थी म्हणाले की, नव्या नियमांबाबत त्यांचे निश्चित मत नाही. तसेच १६.४% विद्यार्थ्यांच्या मते, नवे नियम काळजी करण्यासारखे आहेत. सर्वेक्षणात सहभागी विद्यार्थ्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त (५१.४%) म्हणाले की, न्यू नॉर्मलमध्ये शाळेत जाताना सुरक्षित वाटले. उर्वरीत विद्यार्थी दोन भागात विभागले गेले. पैकी २५.५% म्हणाले की, हे असुरक्षित वाटले तर २३.२% विद्यार्थ्यांना निश्चित मत नोंदवता आले नाही. शाळा नव्याने सुरु करण्यासंबंधी त्यांचे मत हे पालकांच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांपैकी ५५.४% म्हणाले की, याबाबत त्यांच्या पालकांचा पाठींबा आहे तर २६.३% पालकांनी त्यांच्या पाल्याच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली.
याप्रमाणेच सर्वेक्षणात असे दिसून आले की, बहुतांश विद्यार्थी अपेक्षित सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सकारात्मक होते व त्यांनी ते स्वीकारलेही आहे. हे नियम स्वीकारू शकता का, या प्रश्नाला उत्तर देताना प्रतिसाद दिलेल्यांपैकी ६१.३% नी ‘होकार’ दिला तर फक्त १७.७% विद्यार्थ्यांनी ‘नकार’ दिला. २१% विद्यार्थ्यांनी याबाबत मत व्यक्त करणे कठीण असल्याचे म्हटले. निम्मे म्हणजेच ५२.१% विद्यार्थी म्हणाले की, सध्याच्या काळात दूरस्थ शाळा आव्हानात्मक आहेत. तर ५७.४% विद्यार्थी म्हणाले की, ते हायब्रिड लर्निंग मॉडेलला पसंती देतील, ज्यात शाळा पुन्हा सुरु झाल्यावर ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणाची सुविधा असेल.
ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसाणी म्हणाले, “अनेक भारतीय विद्यार्थी लॉकडाऊनदरम्यान अॅक्टिव्ह सेल्फ-लर्नर्स बनले. कारण त्यांनी त्यांच्या समस्यांवरील उपायांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची मदत घेतली. यामुळे शिक्षणाच्या स्रोतांमध्येही वाढ झाली. विद्यार्थ्यांना अधिक लवचिकता प्रदान करत त्यांच्या सेल्फ-लर्निंग पॅटर्नमध्येही बरेच बदल घडले.”
ते पुढे म्हणाले की, “हायब्रिड लर्निंग मॉडेलला विस्तृत प्रमाणावर स्वीकृती मिळेल, कारण ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांमध्ये विशेषत: शाळेनंतरच्या तासांमध्ये खूप महत्त्वपूर्ण मदत केली जाते. हे शिक्षण वर्गाबाहेरही सुरुच राहील कारण विद्यार्थी क्लासरूम सेशन्सवर फॉलोअप घेऊ शकतील तसेच स्वत:च्या गतीने शिकतील.”