
स्थैर्य, फलटण, दि. २९ ऑगस्ट : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुरुवार, दि. २८ ऑगस्ट अखेरपर्यंत प्रशासनाकडे एकूण ६ हरकती दाखल झाल्या असून, नागरिकांना आपल्या हरकती नोंदवण्यासाठी रविवार, दि. ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. ही माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करून त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. नागरिकांना प्रभाग रचनेचा अभ्यास करून आपले म्हणणे मांडण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत संधी देण्यात आली आहे. या मुदतीनंतर कोणत्याही नवीन हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत.
मुदत संपल्यानंतर, प्रशासनाकडे दाखल झालेल्या सर्व हरकती एकत्रित करून त्या पुढील सुनावणीसाठी पाठवल्या जातील. या सुनावणीमध्ये हरकतदारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून नगरपरिषदेची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल.
प्रभाग रचनेवर काही आक्षेप किंवा सूचना असल्यास नागरिकांनी ३१ ऑगस्टपूर्वी नगरपरिषद कार्यालयात नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.