बोरगाव येथे वन्य श्वापदाच्या हल्ल्यात ६ शेळ्या ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नागठाणे, दि. २६ : बोरगाव (ता.सातारा) येथे वन्य श्वापदाने केलेल्या हल्ल्यात ६ शेळ्या मृत्युमुखी पडल्या.रविवारी रात्री ही घटना घडली.या घटनेची माहिती वनविभाग व नागठाणे पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळाल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामे केले. दरम्यान हा हल्ला बिबट्याने केला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव ते आनंद कृषी पर्यटन जाणाऱ्या रस्त्यालगत वडा-पिंपळ नावाच्या शिवारात शरद बबनराव साळुंखे यांचे शिवार आहे.या शिवारात त्यांचा जनावरांचा गोठा व शेळ्यांचे शेड आहे.त्यांच्या सुमारे १० शेळ्या या शेडमध्ये असतात.रविवारी सायंकाळी या सर्व शेळ्या शेडमध्ये बंदिस्त करून ते घरी आले.

रात्री उशिरा वन्य श्वापदाने या शेडमध्ये प्रवेश करून सहा शेळ्या ठार केल्या.यामध्ये १ बोकड,५ शेळ्या यांचा समावेश आहे.त्यापैकी ३ शेळ्या गाभण होत्या.सोमवारी सकाळी शरद साळुंखे शेडकडे गेले असता ही घटना उघडकीस आली.या घटनेची माहिती त्यांनी या विभाग व नागठाणे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला दिली.

वनविभागाचे वनसंरक्षक राज मोसलगी व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक माने,जितेंद्र पांढरपट्टे हे तातडीने घटनास्थळी उपस्थित होत  पंचनामे केले.यावेळी हल्ला करणारे वन्य श्वापद हे पायाच्या आढळलेल्या ठश्यावरून बिबट्या असून या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱयांना दिली आहे.या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची माहिती वनसंरक्षक राज मोसलगी यांनी दिली.सहा शेळ्या वन्य श्वापदाने ठार केल्याने शरद साळुंखे यांचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!