स्थैर्य, फलटण दि.१६ : विडणी, ता.फलटण गावच्या हद्दीत बेडकेवस्ती येथील राजेश नारायण शेंडे व गणेश महादेव शिंदे यांच्या ऊसाला अचानक लागलेल्या आगीत राजेश शेंडे यांचे सुमारे 6 लाख रुपयांचे तर गणेश शिंदे यांचे सुमारे 3 लाखाचे असे एकूण रुपये 9 लाखांचे नुकसान झाले आहे. सदरची आग महावितरणच्या लाईटच्या खांबावर स्पार्किंग होवून उडालेल्या ठिणग्यांमुळे लागली असल्याची फिर्याद राजेश नारायण शेंडे यांनी दिली आहे.
याबाबत राजेश शेंडे यांनी दिलेल्या खबरी जबाबानुसार, काल दिनांक 15 रोजी दुपारी 1 वाजणेच्या सुमारास राजेश शेंडे हे घरी असताना त्यांच्या शेताशेजारी असलेल्या जनाबाई बोडके यांनी त्यांना फोन करुन सांगितले की, ‘‘माझ्या शेतात भांगलत असताना तुमच्या शेतामध्ये असलेल्या लाईटच्या पोलवर जाळ होवून त्याच्या ठिणग्या ऊसात पडून ऊसाला आग लागली आहे.’’ यानंतर राजेश शेंडे तात्काळ त्यांच्या शेतात गेले असता त्यावेळी त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर आग आटोक्यात आली नाही. या आगीमुळे त्यांचे सुमारे 4 एकर क्षेत्रातील ऊसाचे पिक जळून सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाले. तर तीच आग त्यांचे शेजारी असलेले गणेश महादेव शिंदे यांच्या शेतातील ऊसास लागून त्यांचे सुमारे 2 एकर क्षेत्रातील ऊसाचे पिक जळून सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले.
सदर जळीताचा प्रकार हा शेतातील महावितरणच्या इलेक्ट्रीक पोलवर स्पार्किंग होवून त्याच्या ठिणग्या ऊसात पडून झाला असून यामध्ये कोणताही घातपाताचा प्रकार नसून याबाबत योग्य तो तपास व्हावा, अशी मागणी राजेश शेंडे यांनी आपल्या जबाबात केली आहे.