कोळकी जिल्हा परिषद गटासाठी ६ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर; जयकुमार शिंदे यांनी मानले रणजितदादा व सचिन पाटील यांचे आभार


राज्याच्या अर्थसंकल्पात फलटण तालुक्यातील कोळकी जिल्हा परिषद गटासाठी ६ कोटी ८० लाख रुपयांचा भरीव विकास निधी मंजूर झाला आहे. याबद्दल भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे आभार मानले आहेत.

स्थैर्य, कोळकी, दि. 12 मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फलटण तालुक्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी भरगच्च असा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामध्ये कोळकी जिल्हा परिषद गटासाठी तब्बल ६ कोटी ८० लाख रुपयांचा घसघशीत निधी मंजूर करण्यात आला आहे. या भरघोस निधीबद्दल कोळकी जिल्हा परिषद गटातील जनतेच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर व स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानले आहेत.

विकासासाठी आम्ही कटिबद्ध : जयकुमार शिंदे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याच्या विशेषतः कोळकी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी सुमारे सात कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल कोळकी गटातील नागरिकांच्या वतीने जयकुमार शिंदे यांनी या सर्व नेत्यांचे विशेष अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहेत. तसेच, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कोळकी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध असल्याचे मतही जयकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

मंजूर करण्यात आलेला विकास निधी आणि रस्ते

या कोट्यवधींच्या निधीतून परिसरातील अनेक महत्त्वपूर्ण रस्ते मार्गी लागणार आहेत. मंजूर झालेल्या कामांमध्ये प्रामुख्याने निरगुडी ते विंचुर्णी ते तावडी या रस्त्यासाठी सर्वाधिक २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच गिरवी ते दुधेबावी या रस्त्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये, तर फलटण शिंगणापूर रोड ते फलटण पंढरपूर रोड यांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच फलटण दहिवडी रस्ता ते सासकल रस्त्यासाठी ५० लाख रुपये, निरगुडी ते सासकल रस्त्यासाठी ५० लाख रुपये, जाधववाडी ते गिरवी रस्त्यासाठी ५० लाख रुपये आणि सोनवडी ते पिंप्रद या रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या व्यतिरिक्त भाडळी खुर्द ते पाटीलवस्ती या रस्त्यासाठी ३० लाख रुपये आणि सासकल ते झिरपवाडी रस्त्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या सर्व कामांमुळे परिसरातील दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!