स्थैर्य, दि.१०: कोरोनाकाळात खाणकामावर परिणाम होणे आणि खनिजाच्या किमतीत आलेली तेजी आणि चीनकडून पोलादाच्या होणाऱ्या वेगवान खरेदीमुळे देशात पोलादाच्या किमती आतापर्यंतच्या सर्वात उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. हॉट रोल्ड कॉइलचे (एचआरसी) भाव ५८,००० रु. प्रतिटनापर्यंत पोहोचले आहेत. वर्षभरापूर्वी स्टीलच्या किमती ३२,४७१ रु. प्रतिटनापर्यंत पोहोचल्या होत्या. स्टीलच्या किमतीत आलेल्या तेजीने रिअल इस्टेट आणि पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ झाली आहे.
पतमानांकन संस्था इंडिया रेटिंगनुसार, पोलादाची मागणी कोरोनापूर्व काळाच्या पातळीवर आली आहे. नोव्हेंबरमध्ये देशातील मागणीने वेग पकडला आहे. याआधी चीन आणि व्हिएतनामच्या खरेदीमुळे मागणी निघत होती. दुसरीकडे, एप्रिलपासून नाेव्हेंबरदरम्यान सरासरी १३८.१ लाख टन प्रतिमहिना कच्च्या लोखंडाचे उत्पादन झाले. हे वार्षिक आधारावर २७ टक्के कमी आहे. मागणी आणि पुरवठ्यात आलेल्या फरकामुळे कच्च्या लोखंडाच्याकिमती वर्षभरात ६० टक्के वाढल्या आहेत. ६२% एफई आणि कच्च्या लोखंडाच्या किमती गेल्या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ६,०९१ रु. प्रतिटन झाली आहे. एंजेल ब्रोकिंगचे एव्हीपी रिसर्च अनुज गुप्ता म्हणाले, पुरवठ्यात घट कच्च्या लोखंडाच्या किमती वाढवत आहेत. याशिवाय चीन आणि खाण कंपनी रियो टिंटोतील वर्चस्वाच्या लढाईचाही परिणाम म्हणून कच्च्या लोखंडाचे भाव वाढत आहेत.मात्र, इंडिया रेटिंगच्या अहवालानुसार, स्टील कंपन्यांनी कच्च्या लोखंडाच्या वाढलेल्या भावाच्या तुलनेत खूप जास्त किमती वाढवल्या आहेत.
डिसेंबर मध्यपासून आतापर्यंत कच्च्या लोखंडाच्या किमतीत १००० रु. प्रतिटनाची वाढ झाली आहे. स्टील कंपन्यांनी यादरम्यान स्टीलचे भाव ३,७५० प्रति टन वाढवली आहे. विशेष म्हणजे, यादरम्यान पोलाद निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या कोकिंग कोलच्या किमती स्थिर राहिल्या. लहान धातूच्या कंपन्यांनीही स्टीलच्या किमतीतील वाढीसाठी मोठ्या स्टील कंपन्यांतील साटेलोटे जबाबदार असल्याचा आरोप केला. फेडरेशन ऑफ इंडियन मिनरल इंडस्ट्रीजने (फिमी) सरकारकडे लहान स्टील उत्पादकांचे रक्षण करण्याचे आवाहन करत सांगितले की, काही देशी मोठ्या कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात पोलादाच्या उच्च किमतींचा “अयोग्य लाभ’ उचलत असल्याचे म्हटले आहे. फिमीच्या आरोपानुसार, कंपन्या साटेलोटे करून देशातील किमतींना आंतरराष्ट्रीय पातळीसमान आणत आहेत.
कच्च्या लोखंडात दरवाढ
स्टीलच्या भाववाढीमुळे रिअल इस्टेटसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. राष्ट्रीय क्रेडाई सदस्य वासिक हुसेन म्हणाले, रिअल इस्टेटमध्ये १० टक्के वाटा पोलादाचा आहे. पोलादाच्या किमती अचानक वाढल्याने बांधकामाच्या खर्चात ५ % वाढ झाली आहे. सिमेंटच्या किमतीही वाढल्या आहेत. क्रेडाईने पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे.