दैनिक स्थैर्य | दि. २३ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, माणगंगा साहित्य परिषद पांगरी व मॉडर्न इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) ज्ञानदीप शिक्षण संस्था मांडवे यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २५ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय चौथे युवा स्पंदन साहित्य संमेलन श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर सभागृह मार्केट कमिटी फलटण येथे आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाचे उद्घाटन मार्केट कमिटीचे माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रतीथयश कवी व व्याख्याते प्रदीप कांबळे असणार आहेत. यावेळी प्रकाशित पुस्तकांसाठी माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार पुरस्कार वितरण सातारा जिल्हा उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी फलटणचे सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, माजी प्राचार्य रविंद्र येवले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, मार्केट कमिटीचे सचिव शंकरराव सोनवलकर, एमआयटी मांडवेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.एम. डी. ढोबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्वागताध्यक्ष माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे व प्राचार्य सी.डी.ढोबळे यांनी दिली.
उद्घाटन सत्रात ‘एकाकी झुंज’ या पुस्तकाचे प्रकाशन व माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार वितरण केले जाणार आहेत. त्यानंतर ’पुस्तक प्रकाशन कथा आणि व्यथा’ याविषयी परिसंवाद यामध्ये विद्या वैभव प्रकाशनचे संचालक बकुल पराडकर मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारच्या सत्रात कथाकार सौ. रंजना सानप यांचे कथाकथन होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक व कवी विलास वरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वसंतबहार कवी’ खुले कविसंमेलन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव उपस्थित राहणार आहेत.
कवी संमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी राहुल निकम करणार आहेत. समारोप कार्यक्रम महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांचे हस्ते होणार आहे.
यावेळी माजी प्राचार्य शांताराम आवटे, माजी उपप्राचार्य महादेव गुंजवटे उपस्थित राहणार आहेत. यावेळी खुल्या कविसंमेलनातील सहभागी कवींना गौरविण्यात येणार आहे. तरी साहित्यप्रेमी, साहित्यिक, कवी, नवलेखक व ग्रामस्थांनी उपस्थित राहून साहित्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन युवा कवी अविनाश चव्हाण, समन्वय प्रा.सौ. सुरेखा आवळे, सचिव राजेश पाटोळे, आबा आवळे, दत्तात्रय खरात, चैताली चव्हाण यांनी केले आहे.