
स्थैर्य, दहिवडी, दि.४: वडूज येथील विभागीय कार्यालयातील विद्युत वितरण विभागाच्या 48 कर्मचाऱ्यांना शनिवारी अचानकपणे कामावरून कमी करण्यात आले आहे. अचानकपणे कामावरून कमी केल्याने कर्मच्याऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे, तसेच कामगार कमी झाल्याने माण-खटाव तालुक्यांतील वीज वितरणावर परिणाम झाला आहे.
बाह्य स्त्रोताच्या माध्यमातून “महावितरण’ने तब्बल 70 ते 80 टक्के कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. कायम कर्मचाऱ्यांपेक्षा या कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची कामे केली जातात. अनेक कामगार हे दहा ते 15 वर्षे हे काम करत आहेत. मात्र, शनिवारी अचानक या कामगारांना कामावरून कमी केल्याचे सांगण्यात आले. कामगार असण्यासाठी दोन वर्षांचा आयटीआय कोर्स पूर्ण असण्याची अट “महावितरण’ने घातली आहे. त्यामुळे ज्यांचा आयटीआय कोर्स पूर्ण नाही त्यांना कामावरून काढण्यात आल्याची माहिती “महावितरण’च्या अधिकारी, तसेच ठेकेदारांनी दिली. तशी नोटीस या 48 कामगारांना देऊन कामावर येऊ नये असेदेखील सांगण्यात आले आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे “महावितरण’च्या कारभारावर परिणाम झाला आहे. सदर प्रकाराबद्दल या कामगारांनी दहिवडी येथील “महावितरण’च्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
“काही सामाजिक व राजकीय संघटना आर्थिक फायद्यासाठी आमच्या मुळावर उठून उभ्या राहिलेल्या आहेत. मात्र, त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की हे कर्मचारी आपल्या तालुक्यातील असून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. कोरोना महामारी, अतिवृष्टीमध्ये आम्ही रात्रीचा दिवस करून सेवा दिल्याचादेखील “महावितरण’ने विचार करावा.”
– अमर भोसले, कंत्राटी कामगार