दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । सातारा । एटीएम कार्डची अदलाबदली करून ४० हजार रुपये परस्पर काढत माजी सैनिकाची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी युवकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशा प्रकारे कोडोली येथील एटीएममध्ये तिघांनी वृद्धाचे कार्ड घेऊन २० हजार रुपये परस्पर काढले आहेत.
सुनील धर्मराज जाधव (रा. सारखळ, ता. सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. १४) दुपारी ते पैसे काढण्यासाठी पोवईनाक्यावर स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या एटीएममध्ये आले होते. या वेळी तेथे असलेल्या एका युवकाने त्यांचा पासवर्ड पाहिला. त्यानंतर त्याच्या कार्डशी जाधव यांच्या कार्डची अदलाबदली केली. त्यानंतर त्याने सदरबझार येथील एटीएममधून जाधव यांचे एटीएम कार्ड वापरून पाच वेळात एकुण ४० हजार रुपये काढून फसवणूक केली असल्याचे जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
कोडोली येथे ही कृष्णा बाबू वाघमारे (वय ८०) या वृद्धाचेही एटीएम तीन अनोळखी युवकांनी त्यांच्या कार्डशी बदलले. त्यानंतर वाघमारे यांच्या खात्यातून २० हजार रुपये काढल्याची फिर्याद त्यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. हवालदार भोसले तपास करत आहेत.