दिल्लीमध्ये 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढणार : राकेश टिकैत यांची घोषणा, मोदींनी पुढाकार घेतला तर कोंडी फुटेल : पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.७: नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी संपूर्ण देशभरात शनिवारी राष्ट्रीय व राज्य महामार्ग रोखून ठेवले. त्याचा परिणाम जम्मू-काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत दिसला. दिल्ली, यूपी व उत्तराखंडचा अपवाद ठरला. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, ‘कायदे मागे घेण्यासाठी सरकारला २ ऑक्टोबरपर्यंतचा (गांधी जयंती) वेळ दिला आहे. आम्ही सरकारच्या दबावाखाली चर्चा करणार नाही. कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू राहील. ज्या आंदोलनकर्त्यांकडे आधार कार्ड नसेल आणि ज्यांना आंदोलनस्थळी ५ लोक ओळखत नाहीत त्यांनी स्वत:हून निघून जावे. आमचे उद्दिष्ट ४० लाख ट्रॅक्टरसह दिल्लीत रॅली करण्याचे आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवर ‘किसान क्रांती २०२१ असे लिहावे.’ टिकैत म्हणाले की, केंद्र सरकार अजूनही आमचे म्हणणे मान्य करा, असेच म्हणत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्यांना उद्देशून ते म्हणाले की, धरणे स्थळी शिफ्टमध्ये या. कारण आपल्याला येथे आंदोलकांची संख्या सतत वाढवायची आहे. केंद्र सरकारची झोप उडवण्यासाठी लोकांचा मोठा सहभाग खूप आवश्यक आहे.

यूपी, उत्तराखंडवर टिकैत यांनी चर्चा करायला हवी होती : दर्शनपाल
शेतकऱ्यांचा चक्काजाम शांततापूर्ण राहिला, पण तो संपल्यानंतर शेतकरी नेत्यांत प्रथमच मतभेद दिसले. यूपी आणि उत्तराखंडमध्ये चक्काजाम न झाल्याबद्दल शेतकरी नेते दर्शनपाल म्हणाले की, असे वक्तव्य देण्याआधी टिकैत यांनी मोर्चाशी चर्चा केली असती तर बरे झाले असते. तथापि, नंतर आमची त्यांच्याशी चर्चा झाली. पंजाबचे दोन शेतकरी नेते सुरजित फूल व हरपाल सांघा यांना निलंबित करण्यात आले आहे. हे दोघे २६ जानेवारीला ट्रॅक्टर परेडदरम्यान निश्चित केलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने गेले होते.

– दिल्लीत पोलिसांनी सुरक्षेची कडक व्यवस्था केली होती. आंदोलन आटोपेपर्यंत दिल्लीत १० मेट्रो स्टेशन बंद राहिले. – प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसा प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हरियाणा, पंजाब, यूपीमध्ये छापे टाकले. तीन आरोपींना अटकही झाली. – लुधियानात एका आंदोलकाने ट्रॅक्टरवर ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये मारले गेलेल्या जरनैल सिंह भिंडरावालाचा झेंडा लावला होता. – राकेश टिकैत रविवारी हरियाणात कितलाना टोल प्लाझा आणि बाढडा धान्य बाजारात महापंचायतीत सहभागी होतील.

संयुक्त राष्ट्रांची टिप्पणी- ‘न्यायसंगत तोडगा’ शोधण्याची गरज
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने भारताला आवाहन केले की, मानवाधिकारांच्या सन्मानार्थ ‘न्यायसंगत तोडगा’ शोधायला हवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण व्हायला हवे.

महाराष्ट्र
मोदींनी पुढाकार घेतला तर कोंडी फुटेल : पवार
पुणे | दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा संरक्षणमंत्री राजनाथसिंह व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यापैकी कुणी पुढे आले तर ही कोंडी फुटू शकेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, या मुद्द्यावर राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.

केंद्राला शेतकरी आतंकवादी वाटू लागले : राजू शेट्टी
कोल्हापूर | केंद्र सरकारच्या काळ्या कायद्यांविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारला अद्याप दया आलेली नाही. उलट शेतकऱ्यांनाच दहशतवादी आणि आतंकवादी म्हटले जात आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुले आता या सरकारला आतंकवादी वाटू लागली आहेत. दरम्यान, शेतकरी आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात शनिवारी आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद, नगर, नाशिक, जळगाव, सोलापूर,अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, कोल्हापूर, सांगली, पुणे, साताऱ्यासह ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!