शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्यासाठी 35 कोटी मंजूर; खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातून जाणा-या महाड-भोर-शिरवळ रा.मा.965 डी रस्त्यापैकी शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्याचे काम वार्षिक आराखडा 2021-22 अंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून या कामासाठी 35 कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातून रायगडकडे जाणा-या या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्ती, रूंदीकरण व मजबुतीकरण कामाचा सन 2021-22 वार्षिक आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सातारा जिल्हा हद्दीतील शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्याच्या कामासाठी 35 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुरव्याने हा निधी मंजूर झाला असून त्यातून रस्त्याची दुरुस्ती, रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आ.मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी वेळोवेळी मागणी केली होती. त्यासंदर्भात खा.श्रीनिवास पाटील यांनी सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांशी पत्रव्यवहार केला होता. तसेच याविषयी पाठपुरावा करून त्यांना तशी सूचना केली होती. त्यानुसार या कामास सन 2021-22 या वार्षिक आराखड्यामध्ये मंजुरी मिळाली आहे. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे नागरिकांचे व वाहनधारकांचे दळणवळण सुखकर होणार आहे. तर हे काम पूर्णत्वास जाणार असल्याने शिंदेवाडी परिसरातील नागरिकांनी खा.श्रीनिवास पाटील यांचे आभार मानले आहेत.


Back to top button
Don`t copy text!