दैनिक स्थैर्य | दि. 17 जुलै 2024 | फलटण | प्रधानमंत्री जनमान योजनेच्या अंतर्गत फलटण तालुक्यातील खामगाव येथे अनुसूचित जमातीच्या पात्र 30 कुटुंबांना प्रत्येकी 500 चौ. फुटचे 30 प्लॉट देण्यासाठी आदेश पारित करण्यात आले आहेत. फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या माध्यमातून खामगाव येथे अनुसूचित जमातीच्या 30 कुटुंबांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.
फलटण तालुक्यातील खामगाव येथे अनुसूचित जमातीच्या सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही सेवा सुविधा नव्हती. त्यांना मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड काढण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी विशेष मोहीम राबवली होती. त्यानंतर त्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेत घरकुल मंजूर करून दिले आहेत.
खामगाव गावातील गट क्रमांक 290 मधिल 15 हजार चौ. फूट जागा संबंधित अनुसूचित जमातीच्या लाभार्थी यांना वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, फलटण उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदार तुषार देशमुख, तलाठी सचिन पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.