स्थैर्य, औरंगाबाद, दि.१०: हृदयाला छिद्र असल्याने जीवनमृत्यूशी लढणाऱ्या तीन वर्षीय चिमुकल्याला त्याचे माता-पिता उपचारांसाठी अकोल्यातून औरंगाबादेत घेऊन आले. पण येथे जणू कठोर मृत्यू त्याची वाट पाहत होता. मंगळवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी गारखेड्यातील विजयनगर चौकात रिक्षा उलटल्याने त्याची प्राणज्योत जागीच मालवली. विराज श्रीकृष्ण बांगर असे त्याचे नाव आहे. त्याची जीवनयात्रा अशी संपल्याचे पाहून त्याच्या माता-पित्यांनी एकच आकांत केला. तेव्हा सर्वांची मने हेलावून गेली होती.
मातोश्रीनगर, अकोला येथे राहणारे श्रीकृष्ण गजानन बांगर आणि शिल्पा यांचा मुलगा विराजच्या हृदयाला जन्मापासूनच छिद्र असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. सिडको चौकातील एका खासगी रुग्णालयात त्यांना बोलावल्याने ते मंगळवारी सकाळी शहरात आले. डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णालयातून शहानूरमियाँ दर्गा येथे राहणाऱ्या नातेवाइकांकडे जाण्यासाठी रिक्षाने निघाले. रिक्षाचालकाने कामगार चौक, जयभवानीनगर चौक, पुंडलिकनगर रोड मार्गे रिक्षा नेली. साडेसात वाजेच्या सुमारास विजयनगरातून जात असताना अचानक रस्ता ओलांडणारा एक मुलगा आडवा आला. त्याला वाचवण्यासाठी चालकाने जोरात ब्रेक दाबले. यात रिक्षा उलटली. बेसावध असलेले बांगर दांपत्य, विराज बाहेर फेकले गेले. त्यांच्यावर रिक्षा उलटी झाली आणि माता-पिता किरकोळ तर विराज गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, हवालदार कल्याण निकम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवून विराजला रिक्षाखालून काढत एमजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. विराज हे जग सोडून गेला होता. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात रिक्षा जमा करून घटनेची नोंद करण्यात आली आहे.