जिल्ह्यातील 28 करोना केअर सेंटर कुलूपबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२० मार्च २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात करोना संसर्ग घटल्याने जिल्ह्यातील 28 करोना केअर सेंटर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय आरोग्य यंत्रणेने घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी जंबो हॉस्पिटलमधील वैद्यकीय साहित्य हलविण्या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे.

गेल्या काही दिवसांत करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आला असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. बाधितांचा संक्रमण दर पूर्णपणे कमी आल्याने जिल्ह्यातील सर्वच कोरोना केअर सेंटर (सीसीसी) बंद करण्यात आले आहेत. आता जे बाधित आहेत ते सर्व गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालय, करोना केअर सेंटरच्या आकडेवारीवरून संसर्ग दर 0.02 ते0.57 या दरम्यान आहे. जिल्हा रुग्णालयाचे दोन कक्ष करोना व्यतिरिक्त इतर आपत्कालीन सेवांसाठी खुले करण्यात आले आहेत. जंबो रुग्णालय करोना उपचारांसाठी बंद करून पाच महिने झाले आता तेथील वैद्यकीय साहित्य हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने याबत जिल्हाधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार केला आहे.

मार्च 2020 मध्ये पहिल्या लाटेत करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे रुग्णांची आबाळ झाली. या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोना केअर सेंटर सुरू केले होते. यामध्ये बाधित रुग्ण, संशयित रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून उपचारासाठी सुविधा दिल्या जात होत्या. ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत रुग्णसंख्येचे प्रमाण नियंत्रित आल्याने 28 कोरोना सेंटरपैकी केवळ एका ठिकाणी सेंटर सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली. तर ऑगस्टमध्ये करोनाची दुसरी लाट आली. यामध्ये मोठया प्रमाणात बाधित आल्याने सर्व करोना केअर सेंटर फुल्‍ल झाले होते.

सप्टेंबर महिन्यापासून बाधितांची संख्या राज्यभरात आटोक्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून पुन्हा करोनाचा कहर सुरू झाला. त्यानंतर फेब्रुवारी 2022 पासून बाधितांचा संक्रमण दर घटू लागला. गेल्या चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात करोनाची संख्या शून्य आल्याने करोना पूर्णपणे कमी झाला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील बाधित संख्येचा आढावा घेऊन आरोग्य विभागाने सीसीसी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!