मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते लाभार्थ्यांच्या याद्या सरपंचांकडे सुपूर्द
स्थैर्य, रत्नागिरी दि, 13 : निसर्ग चक्रीवादळाचा फार मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व मंडणगड तालुक्यांसाठी रु. 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून येत्या आठ दिवसांच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मदत मिळणाऱ्या वादळग्रस्तांच्या लाभार्थ्यांची यादी आज मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते तालुक्यातील गावाच्या सरपंचांना देण्यात आले.
निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दापोली व मंडणगड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या 25 कोटी निधीच्या वाटपासाठी लाभार्थ्यांच्या यादीचे वितरण दोन्ही तालुक्यातील सरपंचांना केले.
श्री शेख यांनी वादळग्रस्तांना भेट देऊन राज्य शासन वादळग्रस्तांच्या पाठीशी उभे असल्याचे नमूद केले. नुकसान भरपाईचा निधी तातडीने लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रशासनास सूचना दिल्या.
यावेळी मंत्री महोदयांनी श्रीवर्धन तालुक्यातील कोळंबी संवर्धन प्रकल्पाच्या नुकसानीची, जीवना बंदराची हानी, भरडखोल आदी ठिकाणीच्या हानीची पाहणी केली. तसेच तेथील मच्छीमारांशी चर्चा केली.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार भाई जगताप, आमदार योगेश कदम, आमदार अनिकेत तटकरे, माजी मंत्री रामदास कदम, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.