दैनिक स्थैर्य । दि. २३ जानेवारी २०२३ । सातारा । लोणंद येथील सुमारे 21 तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या घरफोडीची उकल करण्यात लोणंद पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी त्यांनी चोरांसह सोनारालाही ताब्यात घेतले आहे.
महेश किरण चव्हाण वय 27, रा. जामदार मळा ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर, मंदार चंद्रकांत पारखी वय 41 राहणार शुक्रवार पेठ सातारा, शाहरुख गुलाब मुर्तजा शेख वय 30 राहणार शनिवार पेठ सातारा आणि श्रीधर प्रकाश माने वय 33, रा. राधिका रोड, सातारा अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 जुलै 2021 रोजी लोणंद तालुका खंडाळा गावच्या हद्दीतील बाजारतळ येथे रात्री घरफोडीचा गुन्हा घडला होता. त्या अनुषंगाने लोणंद पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या घरफोडीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी तपासावत योग्य त्या सूचना दिल्या होत्या. गुन्ह्याचा तपास सुरू असताना उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, लोणंदचा गुन्हे प्रकटीकरण विभाग यांनी कौशल्यपूर्ण तपास करून चोरी करणारे तसेच चोरीस गेलेला माल विकत घेणारे सोनार यांचा या गुन्ह्यातील असणारा सहभाग निष्पन्न करून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी सुमारे 7 लाख 56 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, अंगुलीमुद्रा विभाग साताराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, अविनाश नलवडे, श्रीनाथ कदम, सर्जेराव सुळ, फैय्याज शेख, विठ्ठल काळे, अवधूत धुमाळ, अभिजीत घनवट, मोहन नाचन व राजू कुंभार यांनी केली आहे.