स्थैर्य, नाशिक, दि. 26 : मुंबईमध्ये झालेल्या 1992-93 मधील बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुविख्यात गुंड टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला युसूफ मेमन (वय 54) आज सकाळी 10.30 वाजता इसाक सोबत बाथरूम परिसरात ब्रश करत होता. यावेळी युसूफ अचानक कोसळला. त्यामुळे त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा मृतदेह धुळ्याला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. युसूफ मेमन हा या हल्ल्यातील प्रमुख आरोपी टायगर मेमनचा भाऊ होता. टायगरला फाशीची शिक्षा झालेली असून तो पाकिस्तानात पळून गेल्याचे सांगितले जात आहे. त्याचा दुसरा भाऊ इसाक मेमन हा देखील नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. हे दोघेही 2018 पासून या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. युसूफवर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आणि कटात सहभाग घेतल्याचा आरोप आहे. बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी आपला फ्लॅट दिल्याचा या दोघांवरही आरोप होता.
मुंबईवरील बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी 4 नोव्हेंबर 1994 रोजी 10 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची 22 वर्ष टाडा न्यायालयात सुनावणी चालली. 600 लोकांची साक्ष घेण्यात आली होती. या प्रकरणी 2006 मध्ये न्यायालयात याकूब मेमन आणि अभिनेता संजय दत्तसह 100 आरोपींना दोषी ठरवले होते तर 23आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत 14 दोषींना फाशी ठोठावण्यात आली आहे. यात 2015 मध्ये याकूब मेमनला फाशी दिली गेली आहे तर अबू सालेमसह 22 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी अभिनेता संजय दत्तनेही शिक्षा भोगली आहे. यातील एक आरोपी अब्दुल कय्यूमला जून 2017 मध्ये मुक्त करण्यात आले होते. सध्या या प्रकरणातील आरोपी टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिमसह 27 आरोपी फरार आहेत.