पडळ साखर कारखान्यातील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांसह 19 जणावर खुनाचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १३: सातारा ता (प्रतिनिधी) पडळ (ता.खटाव) येथील के.एम.शुगर कारखान्यातील अधिकारी जगदिप धोंडिराम थोरात (वय40, रा.गोवारे, ता.खटाव) या अधिकार्‍याच्या खूनप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नावाचा समावेश असल्याने खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पडळ (ता.खटाव) येथील के.एम.शुगर कारखान्यामध्ये प्रोसेसिंग अधिकारी म्हणून जगदीप थोरात कार्यरत होते. कारखान्यात अफरातफर झाल्याच्या कारणावरून जबाबदार म्हणून श्री.थोरात यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी , मयत जगदीप थोरात व अन्य काही अधिकारी , कर्मचाऱ्यांनी संगनमताने अफरातफर केल्याच्या कारणावरून जनरल मॅनेजरला ऑफीसमध्ये बोलावून घेऊन बुधवार दि . 10 रोजी सायंकाळी साडे पाच ते आठच्या दरम्यान फारबर काठी , लाकडी काठी , ऊस व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले होते . त्यानंतर रात्री उशिरा त्यांना कराड येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . मात्र त्याठिकाणी त्यांचा गुरूवारी दि . 11 सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या कारखाना पदाधिकारी व प्रशासनावर कठोर कारवाई करा , अन्यथा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा मयताचे नातेवाईक तसेच गोवारे ग्रामस्थांनी घेतला होता . विक्रम आकाराम पाटील ( रा.कापूसखेड , ता . वाळवा , जि . सांगली ) यांनी दिलेल्या माहितीवरून , कराड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भरत तुकाराम पाटील यांनी गुन्हा दाखल केला . पडळ कारखाना वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सदरचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे . सखोल चौकशीअंती थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार घार्गे , मनोज घोरपडे , संग्राम घोरपडे , संचालक महेश घार्गे , कृष्णात शेडगे ( मामा ) , सनि क्षीरसागर , अंजनकुमार घाडगे , अशोक नलवडे , आदींसह अन्य दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . वरील सर्व संशयितांच्या विरोधात भादंवि कलम 302 , 143 , 147 , 148,149,323 लावण्यात आले आहे . तर घोरपडे बंधूंसह इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे . नातेवाईकांच्या जबाबानंतर माजी आमदार प्रभाकर घार्गेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सरकारच्या वतीने कराड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील अशी फिर्याद वडूज पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.


Back to top button
Don`t copy text!