आगामी विधानसभेत रासपचे 15 आमदार निवडून आणणार : महादेव जानकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि.४: राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत असून आगामी काळात राज्याच्या विधानसभेत रासपचे 15 आमदार निवडून आणण्याचे नियोजन केले आहे. रासपा हाच राज्यातील किंग मेकर पक्ष ठरेल, असा विश्‍वास राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.

सातारा येथील नगरपालिका मंगल कार्यालयमध्ये रासपचा मेळावा पार पडला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार जानकर बोलत होते. आमदार जानकर म्हणाले, ’सातारा जिल्ह्यामध्ये फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघावर रासपने लक्ष केंद्रित केलेले आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये रासपची ताकद मोठी आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये रासपचे आमदार निवडून येतील. राज्यामध्ये खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष जसा किंगमेकर आहे, तसा भविष्यामध्ये रासप पक्ष निश्‍चितपणे भूमिका बजावेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांचे देखील आमदार जानकर यांनी समर्थन केले आहे. केंद्रीय कृषी मंत्री पदावर असलेले तोमर हे शेतकर्‍यांचे पुत्र आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाची त्यांना चांगली जाण आहे. काँग्रेसचे कृषी कायदे चुकीचे असल्यानेच देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्या विधेयकामुळे निश्‍चितपणाने शेतकर्‍यांचा लाभ होणार आहे, असे ते म्हणाले.

महायुती सरकारच्या काळामध्ये पशुसंवर्धन मंत्री असताना मी गायीच्या व म्हशीच्या दुधाला दर वाढवून दिला. आता भाजप व मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर नाही जे सरकार महाविकास आघाडीचे सत्तेवर आहे, त्यांची नियत चांगली नाही. आम्ही सत्तेवर असतो तर गाईच्या दुधाला 65 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 85 रुपये दर दिला असता, असा दावा देखील जानकर यांनी यावेळी केला.


Back to top button
Don`t copy text!