स्थैर्य, खंडाळा, दि.१४: खंडाळा तालुक्यातील पळशी, दत्तनगर परिसरात डोंगरालगतच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजक, बैलगाडा चालक अशा 13 जणांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीसांनी दोन वाहनांसह तब्बल 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दत्तनगर परिसरात मोकळ्या जागेमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिरवळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा टाकला असता त्याठिकाणी आशिष मोहिते, आकाश गावडे, करण भरगुडे, ओंकार भरगुडे, प्रविण भरगुडे, शुभम भरगुडे, जनार्दन कोळपे, पिनू भरगुडे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बैलगाडा शर्यतीच्या आदेशाचा भंग करीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याचे निदर्शनास आले.
बैलगाडी शर्यतीमध्ये धायरेश्वर बाळासो पाटील (वय 28), आकाश किसन गावडे (वय 28), विशाल आनंदा बाटे (वय 27), वसंत विठ्ठल बाटे (वय 28), संकेत उत्तम बाटे (वय21, सर्व रा. केंजळ, ता. भोर, जि. पुणे) यांनी स्वतःच्या मालकीचे बैलांना चाबूक व काठीच्या साहाय्याने निर्दयपणे मारहाण करत पळवले आहे.
याप्रकरणी आशिष मोहिते, आकाश गावडे, करण भरगुडे, ओंकार भरगुडे, प्रविण भरगुडे, शुभम भरगुडे, जनार्दन कोळपे, पिनू भरगुडे या आयोजकांसह धायरेश्वर पाटील, आकाश गावडे, विशाल बाटे, वसंत बाटे, संकेत बाटे यांच्याविरुध्द विविध कलमांतर्गत शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन वाहनांसह शिरवळ पोलीसांनी नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद शिरवळ पोलीस स्टेशन याठिकाणी पोलीस हवालदार विनोद पवार यांनी दिली असून तपास पोलीस हवालदार संतोष मठपती हे करत आहे.