गोविंद डेअरीच्या दूध उत्पादकांच्या खात्यात १३.५१ कोटी अनुदान जमा; ७४ टक्के पशूपालकांना लाभ


दैनिक स्थैर्य | दि. १७ एप्रिल २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासनाने ११ जानेवारी २०२४ ते २० मार्च २०२४ या कालावधीसाठी राज्यातील दूध उत्पादकांना जाहीर केलेल्या पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे विशेष अनुदान योजना नुकतीच कार्यान्वित करण्यात आली. या योजनेमध्ये सातारा जिल्ह्यातील ‘गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट’ या दूध डेअरीच्या माध्यमातून या संस्थेच्या दूध उत्पादकांना तब्बल १३ कोटी १५ लाख रुपये इतके अनुदान दूध उत्पादकांना मिळाले आहे. यापैकी बहुतांशी रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झालेली आहे व उर्वरित रक्कम लवकरच जमा होणार आहे.

या योजनेंतर्गत गोविंद मिल्कच्या १३१५२ दूध उत्पादकांना या योजनेचा लाभ मिळाला. तसेच गोविंदच्या एकूण संकलनापैकी ७४ टक्के दूध या योजनेमध्ये अनुदानासाठी पात्र ठरले. विशेष म्हणजे शासनाने पूर्वी जाहीर केलेल्या कालावधीमध्येच बहुतांश काम गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस्च्या वतीने अतिशय योजनाबद्ध रीतीने पूर्ण करण्यात आले. ही योजना जाहीर झाल्यानंतर त्यातील अटी व नियम पाहता राज्यातील ती दूध उत्पादक या योजनेसाठी पात्र होऊ शकतील, अशी शंका सर्वांनाच असताना गोविंद मिल्कच्या जास्तीत जास्त दूध उत्पादकांपर्यंत या योजनेचा लाभ कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचवला पाहिजे, ही ठाम भूमिका घेऊन गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस्चे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार दूध संकलन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागातील सर्व कर्मचार्‍यांनी अतिशय मेहनत घेऊन ही क्लिष्ट प्रक्रिया वेळेत पूर्ण करून इतर संस्थांनाही या योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग विस्तृत करून दिला.

महाराष्ट्र राज्याच्या पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग खात्याचे सचिव श्री. तुकाराम मुंडे यांनी ही योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित होईल व राज्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांपर्यंत या योजनेचा लाभ मिळेल, यासाठी विशेष काळजी घेतली. सदर कामकाजामध्ये राज्याच्या दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त श्री. मोहोड यांनी अनुदान प्रक्रियेतील प्रगतीबद्दल सतत पाठपुरावा करून योजनेचा लाभ घेण्याबद्दल गोविंद आणि गोविंद मिल्कच्या टीमला प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या संपूर्ण टीमचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी श्री. प्रकाश आवटे साहेब, श्री. रासकर साहेब, श्री. धुर्गुडे साहेब, श्री. मोहिते साहेब व श्री. पवार साहेब यांचे अतिशय मोलाचे सहकार्य गोविंद मिल्कच्या टीमला मिळाले.

योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये गाईंना बिल्ले मारणे व गाईंची प्राथमिक माहिती नोंदणी करणे यासाठी तालुका लघु पशूवैद्यकीय सर्व चिकित्सालय, फलटणचे सहाय्यक आयुक्त डॉ. विश्वंभर पवार साहेब यांचे सहकार्य यासाठी लाभले. तसेच पशूसंवर्धन उपायुक, सातारा डॉ. बोर्डे साहेब, डॉ. बरकडे साहेब, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील सर्व पशूधन विकास अधिकारी व पशूसंवर्धन विभागाचे कर्मचारी यांनी देखील अतिशय तत्पर सेवा देऊन या योजनेतील प्राथमिक स्वरूपाचे कामकाज वेळेत पूर्ण होईल यासाठी मेहनत घेतली.

या योजनेचा शेतकर्‍यांना थेट फायदा झाल्यामुळे गोविंद मिल्कच्या सर्व दूध उत्पादकांकडून गोविंदचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गोविंदच्या संकलन विभागातील सर्व अधिकारी आणि महाराष्ट्र शासनाच्या दोन्ही विभागातील संलग्न अधिकार्‍यांचे दूध उत्पादकांमार्फत आभार मानण्यात आले आहेत.


Back to top button
Don`t copy text!