स्थैर्य, मुंबई, दि.११: कोरोना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात काही अडसर निर्माण झाले. मात्र, यावर मात करून यंदा बारावी व दहावीच्या परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, परंतु काहीशा उशिरा म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षाचे महत्त्व लक्षात घेऊन प्राधान्याने त्यांचा अभ्यास व परीक्षा पद्धतीचा विचार शिक्षण विभाग करत आहे, ज्यामुळे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञांशी विचारविनिमय सुरू असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यात २३ नोव्हेंबरपसून ९वी ते १२वीचे वर्ग सुरू झाले असून, ५ लाखांहून अधिक विद्यार्थी उपस्थिती राहत आहेत, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झाले आहेत. दिवसागणिक या वर्गांमधील विद्यार्थी संख्यादेखील वाढत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने विद्यार्थी व शिक्षक संक्रमित झाले नाहीत, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. मात्र, लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्यविषयक सूचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने सध्या पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी आम्ही अद्याप कोणतीही भूमिका मांडली नसल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.
पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करताना, सर्वप्रथम या वर्गातील विद्यार्थी, शिक्षक संख्या, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांची सुरक्षा, कोरोना चाचण्या व वर्गातील नियोजन ही मोठी जबाबदारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा, आरोग्यविषयक बाबींचा विचार करून, तसेच या संदर्भात स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.