मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू; सर्व मृतदेहांची ओळख पटली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । मुंबई । मध्य प्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्रात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. नदी पात्रातून आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्वांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये एसटीचे चालक आणि वाहक यांचाही समावेश असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर (जळगाव जिल्हा) आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच ४० एन ९८४८ ही आज सकाळी ७.३० च्या सुमारास इंदोर येथून मार्गस्थ झाली. त्यानंतर मध्य प्रदेशमधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर ही बस अपघातग्रस्त होऊन नर्मदा नदीत कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत मदत व बचाव कार्याबाबत विनंती केली. स्थानिक जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या बचावकार्यात १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. हे सर्व मृतदेह धामणोत येथील ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले असून अजूनही शोधमोहिम सुरु असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. चन्ने यांनी सांगितले. हा अपघात अत्यंत दुर्देवी असून असे प्रसंग टाळण्यासाठी महामंडळातर्फे उपाययोजना केल्या जातील, असे सांगतानाच या अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून, या समितीला तातडीने चौकशी करण्यास सांगितले आहे, असे श्री. चन्ने म्हणाले.

दुर्घटनेतील सर्व मृतदेहांची ओळख पटली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे

१.चंद्रकांत एकनाथ पाटील – (४५) (चालक) अमळनेर २. प्रकाश श्रावण चौधरी (वाहक), अमळनेर ३.अविनाश संजय परदेशी, अमळनेर ४.राजू तुलसीराम (३५) राजस्थान, ५. जगन्नाथ जोशी -(६८) राजस्थान, ६. चेतन जागीड, राजस्थान ७. निंबाजी आनंदा पाटील, अमळनेर, ८. सैफउद्दीन अब्बास अली बोहरा, मध्यप्रदेश ९. कल्पना विकास पाटील – (५७) धुळे, १०. विकास सतीश बेहरे – (३३) धुळे, ११.आरवा मुर्तजा बोहरा – (२७) अकोला, १२. रुख्मणीबाई जोशी, राजस्थान.


Back to top button
Don`t copy text!