पुण्यात पिस्तुल विक्री करणाऱ्या टोळीच्या 12 जणांना अटक, 24 पिस्तुल जप्त; येरवडा तुरुंगात केली जात होती विकण्याची प्लॅनिंग


स्थैर्य, पुणे, दि. २८:  पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरोपींना सशस्त्र पकडले जात आहे. ही शस्त्रे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून आणली गेली आहेत आणि पुणे शहर भागात विकली जात आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड शहराच्या भोसरी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत 12 गुन्हेगारांना अटक केली आणि 24 पिस्तुल, 38 जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिस आयुक्तांनी सांगितले की, या टोळीचा संबंध मध्य प्रदेश, यूपी आणि पुण्यातील येरवडा तुरुंगाशी आहे.

ते म्हणाले की, आरोपी तुरुंगात एकमेकांना भेटले आणि तेथून आरोपींनी शस्त्र पुरवठा करण्याचे काम सुरू केले. सर्व आरोपींवर शस्त्र कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी बबलू सिंग उर्फ ​​रॉनी अत्तार सिंग बरनाला, काळू उर्फ ​​सुशील मांगीलाल पावरा, रूपेश उर्फ ​​संतोष सुरेश पाटील, उमेश अरुण रायरीकर, बंटी उर्फ ​​अक्षय राजू शेळके, धीरज अनिल ढगारे, दत्ता उर्फ ​​महाराज सोनबा मरगळे, मॉंटी संजय बोथ उर्फ वाल्मिकी, यश उर्फ ​​बबलू मारुती दिसले, अमित बाळासाहेब दगडे, राहुल गुलाब वाल्हेकर आणि संदीप अनंता भुंडे यांना अटक केली आहे. सर्व गुन्हेगार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात राहतात.

अशी केली कारवाई
भोसरी पोलिस गस्त घालत असताना पोलिस कर्मचारी गणेश सावंत आणि सुमित देवकर यांना एका गुन्हेगाराची माहिती मिळाली. रूपेश पाटील पकडला असता त्याच्याकडून 4 पिस्तूल, 4 काडतुसे मिळाली. कठोर चौकशीनंतर आणखी काही धक्कादायक माहिती मिळाली. ज्याचे तार मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पुण्यातील येरवडा कारागृहाशी जोडले होते.

सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे आणि त्यांची एक टीम मध्य प्रदेशात गेली. जंगलातून पिस्तूल विक्री करणारा मुख्य व्यापारी रॉनी याला पकडण्यात आले. भोसरी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवर कारवाई करत 24 लाख किंमतीच्या 24 पिस्तुल आणि 38 जिवंत काडतुसे जप्त केली. यानंतर उमेश रायकर, राहुल वाल्हेकर, धीरज ढगारे यांना अटक करण्यात आली. येरवडा कारागृहातील गुन्हेगाराशी संपर्क साधल्यानंतर यूपीमध्ये तयार केलेली पिस्तूल जळगावमार्गे पुणे, पिंपरी चिंचवड शहरात विकल्या जात होत्या.


Back to top button
Don`t copy text!