ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
दैनिक स्थैर्य । दि. ०४ जानेवारी २०२३ । सातारा । महाराष्ट्राच्या सर्वात उंच कळसुबाई शिखरावर राज्यातील 111 दिव्यांगांनी एकत्र येत नववर्षाचे स्वागत व स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष साजरा केला. शिवुर्जा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षापासून कळसुबाई शिखरावर दिव्यांगांसाठी ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात येते. शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे हे स्वतः दिव्यांग असून जिद्दी व आत्मविश्वास असलेल्या दिव्यांगांसाठी ते गेल्या सन 2010 पासून कळसुबाई शिखरावर ऊर्जा मोहिमेचे आयोजन करतात. यावर्षी आयोजित केलेल्या अकराव्या मोहिमेसाठी राज्यातील औरंगाबाद ,पुणे, नाशिक, बीड ,अकोला, लातूर, धुळे ,मुंबई ठाणे, नगर ,नांदेड ,बुलढाणा ,सांगली ,सातारा ,नागपूर ,यवतमाळ ,गडचिरोली ,वर्धा ,ठाणे ,पालघर, उस्मानाबाद ,परभणी ,हिंगोली, वाशिम जळगाव या जिल्ह्यातील अस्थिव्यंग ,अंध, मूकबधिर, बहु विकलांग, मतिमंद सह सर्व प्रकारच्या 111 दिव्यांगांनी सहभाग नोंदविला.
राज्यातील ही सर्व दिव्यांग मंडळी बारी तर कोणी जहांगीरवाडी या गावातून 31 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत माची मंदिरावर एकत्र झाली. एकमेकांच्या परिचयासह प्रत्यक्ष चढाईला दुपारी दोन वाजता सुरुवात करण्यात आली. एकमेकांना आधार देत घोषणा देत ,खाच खळगे ,डोंगरदऱ्या ,वेडी वाकडी वळणे, झाडाझुडपातून, खडक आणि मोठाले दगड धोंडे पार करत व अनेक उभ्या चढणीच्या लोखंडी शिड्या चढाई करत रात्री सात वाजता शिखर माथ्यावर यशस्वी चढाई केली. रात्रीचा मुक्काम शिखर माथ्यावरील विहिरीजवळ तीस कापडी तंबूत आणि कडाक्याच्या थंडीत ठोकण्यात आला. पहाटे पुन्हा मंदिर सुळका चढाई करण्यात येऊन एक जानेवारी नऊ वर्षाच्या नव सूर्याचे स्वागत करून स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. शिखर माथ्यावरून सकाळी नऊ वाजता उतरण्यास सुरुवात करण्यात येऊन अवघ्या चार तासात दुपारी एक वाजता पायथा गाठण्यात आला. सहभागी झालेल्या 111 दिव्यांग यापैकी 25 मुली व महिला होत्या तर पंधरा व्यक्ती ह्या 100% अंध प्रकारच्या होत्या. त्यातील फक्त चार मुली व दोन मुलांनी आपल्या सोबत मदतनीस घेतलेले दिसून आले उर्वरित सर्वच दिव्यांगांनी विना मदतनीस कळसुबाई शिखर यशस्वी चढाई व उतराई विना अपघात पूर्ण केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली व सचिव कचरू चांभारे यांच्या नियोजनाखाली सदरील दिव्यांग ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. कळसुबाई शिखरावर झालेल्या छोटे खाणी कार्यक्रमात शिवुर्जा प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यंदाचा दिव्यांग ऊर्जा पुरस्कार यावर्षी सुभाष सज्जन नांदेड, डॉ.अनिल बारकुल बीड ,पारसचंद साकला औरंगाबाद ,सतीश आळकुटे पुणे ,काजल कांबळे सांगली व डॉ. पंचलिंग सोमनाथ यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे शिवाजी गाडे ,कचरू चांभारे, सागर बोडके ,अंजली प्रधान, केशव भांगरे ,जगन्नाथ चौरे, मच्छिंद्र थोरात, जीवन टोपे, सतीश आळकुटे,सुभाष मुळीक,विजय जठार सह अनेक दिव्यांग सहभागी झाले होते.