दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२३ । मलप्पुरम । केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात थूवलथीराम तटाजवळ झालेल्या बोट दुर्घटनेत मृतांचा आकडा २२ पर्यंत पोहचला आहे. या अपघातानंतर घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ११ लोकांचा जीव गेला. त्यात ३ लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मल्लपुरम जिल्ह्यातील तनूर येथे डबर डेकर पर्यटक बोट पलटल्याने ही दुर्घटना घडली. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या मते, ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. त्यात ८ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सध्या त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बोटीत ३० पेक्षा अधिक प्रवासी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोठ्या संख्येने स्थानिक लोक दुर्घटनेतील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. बोट रोखण्यासाठी लोकांची रस्सीचा वापरही केला.
स्थानिक मीडियानुसार, या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत अधिकाधिक मुलांचा समावेश आहे. जे सुट्ट्यांमुळे फिरायला चालले होते. अनेकांनी लाईफ जॅकेटही घातले नव्हते असं केरळचे क्रिडा आणि मत्स्य पालन मंत्री अब्दुर्रहमन यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केरळ बोट दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत शोध सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पनियारी विजयन यांनी दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे तर पंतप्रधान कार्यालयाकडूनही अपघातातील पीडितांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचं जाहीर केले आहे.