दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । महाराष्ट्राचे भाग्यविधाते व देशाचे थोर नेते, रसिक, साहित्यिक व विचारवंत स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दि.25 व 26 नोव्हेंबर 2022 रोजी फलटण येथे 10 वे ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन’ विविध साहित्यिक कार्यक्रमांनी पार पडणार असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या संमेलनबाबत सविस्तर माहिती देताना संयोजकांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मार्च 2012 मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेच्या पुढाकारातून यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम सुरु करण्यात आला. यावर्षीचे या संमेलनाचे 10 वे वर्ष आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत येणारे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा आयोजित व येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरु प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने यंदाचे संमेलन शुक्रवार, दिनांक 25 नोव्हेंबर व शनिवार, दिनांक 26 नोव्हेंबर 2022 असे दोन दिवस वेणूताई चव्हाण साहित्य नगरीमध्ये (नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय परिसर, फलटण) संपन्न होणार आहे.
दि.25 नोव्हेंबरला सकाळी 9:00 वाजता फलटण शहरातील सर्व प्रमुख शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आयोजित ग्रंथ दिंडीच्या शुभारंभासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मराठा शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रमुख खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी – बेडके, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे, जयभवानी एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख सह्याद्रीभैय्या कदम, श्री सद्गुरु शिक्षण संस्थेच्या सचिव अॅड.सौ.मधुबाला भोसले आदी मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. ही ग्रंथदिंडी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्यापासून सुरु होवून संमेलनस्थळाकडे जाईल.
संमेलनाचे उद्घाटन दि.25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे व संत साहित्याचे अभ्यासक माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते व संमेलन अध्यक्ष किशोर बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्यावरील आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व ग्रंथांचे स्वतंत्र दालन असलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचा शुभारंभ प्रसिद्ध वक्ते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांच्या हस्ते व महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे पुणे विभागीय उपसंचालक तथा लेखक डॉ.राजू पाटोदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे व कोषाध्यक्ष सौ.सुनिताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर, उद्धव कानडे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ व प्रदीप पाटील (इस्लामपूर) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या उद्घाटन समारंभातच सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या उत्कृष्ट नियतकालिकांना, उत्कृष्ट दिवाळी अंक व त्यातील उत्कृष्ट लेखक व कवि यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सहकारातील एका संस्थेला महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पुरस्कृत ‘यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कारा’चे वितरण, कोल्हापूर विभागातील साहित्य संमेलने आयोजित करणार्या प्रमुख साहित्य संस्थांचा सन्मानही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
उद्घाटन समारंभानंतर दुपारी 4 ते 5:30 या वेळेत ‘पत्रकारांचे मराठी साहित्यातील योगदान’ या विषयावरील परिसंवाद प्रसिद्ध विचारवंत व अभ्यासक डॉ.अशोक चौसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला असून त्यामध्ये वक्ते म्हणून दैनिक पुण्यनगरीचे सातारा आवृत्ती प्रमुख विनोद कुलकर्णी व पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत प्रसिद्ध साहित्यिक ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांची ‘यशवंतराव चव्हाण आणि माझी जडणघडण’ या विषयावरील प्रकट मुलाखत, दुपारी 12 ते 1:30 या वेळेत ज्येष्ठ कवी, साहित्यिक विसुभाऊ बापट यांचा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘75 वर्षातील मराठी कवितांची वैभवशाली वाटचाल’ हा कार्यक्रम प्रसिद्ध कवी उद्धव कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.
दि.26 रोजी दुपारी 2:30 वाजता या संमेलनाचा समारोप महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार असून यावेळी प्रसिद्ध वक्ते, लेखक मधुकर भावे यांचे ‘यशवंतराव चव्हाण व आजचा महाराष्ट्र’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. यावेळी मधुकर भावे यांना यंदाच्या ‘यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्कारा’ने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री तथा भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही यावेळी संपन्न होणार आहे.
यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिला अभिवादन म्हणून या संमेलनाला यशवंतराव चव्हाणप्रेमींनी, साहित्यिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष सचिन सूर्यवंशी – बेडके, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ व महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले आहे.