दैनिक स्थैर्य । दि. 02 डिसेंबर 2021 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबतचा मंत्रिमंडळ निर्णय नुकताच घेण्यात आला असून या संदर्भातील विधेयक आगामी विधीमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास फलटण तालुक्यात 1 जिल्हा परिषद गट व 2 पंचायत समिती गण नव्याने वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. येत्या काही महिन्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु होणार असून त्याअनुषंगाने नवीन निर्णयानुसार तालुक्यातील गट व गणाची पुर्नरचना कशी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या संभाव्य पुर्नरचनेमुळे आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांच्या रणनितीला ताप्तुरता ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचा विचार केला तर फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाची एक हाती सत्ता आहे. नवीन निर्णयानुसार फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचा 1 गट वाढून एकूण 8 गट तयार होतील तर पंचायत समितीचे 2 गण वाढून 16 गण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत पुन्हा विद्यमान सदस्य लढणार की नवीन चेहरे दिसणार हे सर्व गट व गणाची पुर्नरचना व आरक्षण यावर अवलंबून आहे. दरम्यान, संबंधित विधेयक अधिवेशनात मंजूर झाल्यास नव्याने होणारी संभाव्य जिल्हा परिषद सदस्य संख्येमधील वाढ ही लोकसंख्येच्या आधारे राज्य निवडणूक आयोग निश्चित करणार आहे. त्यामुळे याबाबत सध्या तरी कोणताही अंदाज व्यक्त करणे कठीण आहे.
आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटामध्ये सध्या युवकांना विविध पदांवर संधी देण्याचे काम सुरू आहे. युवानेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांना नुकतीच फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी देऊन फलटण तालुक्यातील युवकांना एक वेगळा संदेश देण्याचे काम राजे गटाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. सन 1991 पासून फलटण तालुक्यावर संपूर्णत: राजे गटाची सत्ता असली तरी आगामी काळामध्ये होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये विरोधकांचा टक्का वाढू न देण्याचे आव्हान राजे गटासमोर असणार आहे.
गत निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये होते. जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या पत्नी अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर या गिरवी गटामधून निवडून आल्या होत्या. अन्य कोणत्याही जागेवर काँग्रेसला यश मिळवता आले नव्हते. परंतु त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये त्यांनी जोरदार संघटन केले आहे. पक्षाच्या माध्यमातून तालुक्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी ते काम करीत आहेत. त्यानुसार त्यांचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ सुरु असून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ते अर्थातच राजे गटासमोर कशा पद्धतीने कडवे आव्हान उभे करतात, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.