स्थैर्य, सातारा, दि.०६: नगर येथील मिल्ट्री रेकॉर्डच्या ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी लावतो, असे सांगून 1.55 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला. संजय वसंत घाडगे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून दुसरा संशयित हा संजय घाडगे याचा मेहूणा असून त्याचे पूर्ण नाव आणि पत्ता समजू शकलेला नाही. दरम्यान, मुलाला पाईंटमेट लेटर कधी मिळणार, अशी विचारणा केली म्हणून संशयित संजय घाडगे याने फिर्यादीलाच तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, संजय हणमंत बर्गे (वय 52, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संजय वसंत घाडगे (रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) यांचा मेहूणा (नाव व पत्ता माहित नाही) याने मी नगर येथील मिल्ट्रीच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये कमांडिंग ऑफिसर यांचा पीए असून ’मी तुमचा मुलगा आकाश याला मिल्ट्री रेकॉर्ड ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून भरती करतो,’ असे सांगितले. यानंतर बर्गे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक (पोवई नाका शाखा) आणि कर्नाटक बँकेच्या खात्यातून घाडगे याच्या खात्यावर रोख तसेच एनएफटीद्वारे 1.55 लाख रुपये भरले. यानंतर संजय घाडगे याने त्याचा मेहुण्याला फोन लावला आणि संजय बर्गे यांना मोबाईल कॉन्फरन्सवरती घेवून ’तुम्हाला अपॉईंटमेंट लेटर पोस्टाने येईल,’ असे सांगितले.
दरम्यान, बरेच दिवस झाले तरी मुलगा आकाश याला अपॉईंटमेंट लेटर न आल्याने त्याची विचारणा संजय बर्गे यांनी संजय घाडगे याला केली. मात्र, घाडगे याने तुम्ही मला येथून पुढे भरतीसंदर्भात कोणत्याही प्रकारची विचारणा करुन त्रास देवू नका. मी तुमच्या विरुध्द खोटे गुन्हे दाखल करेन अशी धमकी दिली. या संपूर्ण प्रकारानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यामुळे संजय बर्गे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संजय घाडगे आणि त्याच्या मेहुण्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस हवालदार मोघा मेचकर या करत आहेत.