दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | फलटण | २५५ फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघातील मतदार यादी दि. १ जानेवारी २०२२ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह पुनररिक्षण कार्यक्रम सध्या सुरु असून दि. ३१ ऑक्टोबर अखेर या मतदार यादीतील दुबार, समान, एकापेक्षा अधिक नोंदी व तांत्रिक त्रुटी दूर करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आणून देत मतदारांनी आपले व कुटुंबातील मतदारांची नोंद व छायाचित्र बरोबर असल्याची खात्री करुन घ्यावी असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी २५५ फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघ समीर यादव यांनी केले आहे.
या विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र स्तरीय अधिकारी रविवार दि. ३१ ऑक्टोबर अखेर घरोघरी भेट देवून मतदार यादी तपासणी व पडताळणी करतील त्यांना योग्य माहिती द्यावी, याच कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण करण्यात येणार असल्याचे तहसीलदार समीर यादव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सोमवार दि. १ नोव्हेंबर रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून दि. १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान त्यावरील दावे, हरकती, सूचना स्वीकारण्यात येणार आहेत, दरम्यान नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक शनिवार व रविवार मतदार यादी अद्ययावतीकरण कार्यक्रमानुसार विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सोमवार दि. २० डिसेंबर २०२१ अखेर मतदार यादीवरील सर्व हरकती, दावे, सुचनांबाबत योग्य निर्णय घेवून ते निकाली काढण्यात येणार असून बुधवार दि. ५ जानेवारी २०२२ रोजी २५५ फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघ मतदार यादीचे अंतीम प्रसिद्धीकरण करण्यात येणार असल्याचे तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी २५५ फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघ समीर यादव यांनी कळविले आहे.
दरम्यान मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी अर्ज नमुना नंबर ६, मृत व्यक्ती, दुबार नावे आणि स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणेसाठी अर्ज नमुना नंबर ७, मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्तीसाठी अर्ज नमुना नंबर ८, मतदार संघांतर्गत यादी भागातील बदलांसाठी अर्ज नमुना नंबर ८अ, नवीन मतदार ओळख पत्र मिळण्यासाठी नमुना नंबर ००१ अर्ज भरुन केंद्र स्तरीय अधिकारी अथवा तहसील कार्यालय निवडणूक शाखेत द्यावेत असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी २५५ फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघ समीर यादव यांनी केले आहे.