
दैनिक स्थैर्य | दि. 24 नोव्हेंबर 2023 | सातारा | सातारा लोकसभेची जागा युतीधर्माप्रमाणे शिवसेनेचीच आहे. यापूर्वी हिंदुराव नाईक-निंबाळकर हे निवडून आले होते. महायुतीतील चर्चेनुसार व वरिष्ठांच्या आदेशानुसार जो उमेदवार देण्यात येईल, त्यास निवडून आणले जाईल. परंतु, आजपर्यंत खंडाळा तालुक्याला आमदार किंवा खासदार या नात्याने कधीच प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंत शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केली.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जाधव म्हणाले की, आजपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी मिळाला नसल्यामुळे खंडाळा तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर निधी मंजूर होऊन काही प्रमाणात प्रश्न मार्गी लागले आहेत. मांढरदेवी रस्ता झाला, तर दळणवळण वाढून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. आतापर्यंत निधी या रस्त्यासाठी का मिळाला नव्हता.
तथापि, रस्त्याचा प्रश्न चर्चा करून मार्गी लावला असल्याचे जाधव म्हणाले.
लोकसभेला मतदारसंघ शिवसेनेला मिळणार काय अन् तुम्ही इच्छुक आहात काय? असा प्रश्न उपस्थित केला असता जाधव म्हणाले, युतीच्या वाटपात ही जागा शिवसेनेकडेच आहे. यापूर्वी हिंदुराव नाईक-निंबाळकर हे निवडून आले होते. हा मतदारसंघ युतीच्या वाटपात शिवसेनेकडे आहे. वरिष्ठ यांच्या निर्णयानंतर ते जो उमेदवार देतील, त्या सेनेच्या उमेदवाराला आम्ही निवडून देणार आहे. २००९ मध्ये अपक्ष लढलो. तरी अडीच लाख मते मिळाली होती. २०१९ मध्ये त्यावेळचे संपर्क प्रमुख बानगुडे-पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेत गेलो होतो. लोकसभेला उभे राहिलो. मी खासदार उदयनराजे भोसले यांचेही काम केलं आहे. पक्ष जो उमेदवार देतील त्याचे काम केले जाईल, असे जाधव यांनी सांगितले.
आम्हाला महायुतीचा खासदार निवडून आणायचा आहे. आमदार मकरंद पाटील यांच्यावर रोष नाही. ते आमच्यासोबतच काम करत आहेत. ते युती आल्यामुळे माझी कोणतीही अडचण झाली नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.