दैनिक स्थैर्य । दि. ०४ जून २०२२ । सूर्यकांत भिसे / मुक्ताईनगर ।
वाट पाहे निढळी ठेवूनिया हात l
पंढरीच्या वाटे माझे लागले चित्त ll
जगन्नियंता परमात्मा कटेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत उभा आहे . त्याच्या भेटीसाठी चित्त आतुर झालेल्या हजारों वैष्णवांनी रणरणत्या उन्हांची तमा न बाळगता आदिशक्ती संत मुक्ताबाईसह आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर येथून शेकडो वर्षापासून अखंडित पणे आषाढी एकादशीस विठूरायाचे भेटीसाठी जाणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर वारीने ” मुक्ताबाई मुक्ताबाई ! आदिशक्ती मुक्ताबाई !!जयघोषात दुपारी १२ वा.विधिवत पादूका पूजनाने पालखी प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी गेली दोन वर्षे कोरोनामुळे थांबलेली पायी वारी पुन्हा सुरु झाल्याने कालपासून उत्तर महाराष्ट्र , विदर्भ , मराठवाड्यासह मध्यप्रदेश राज्यातून हजारो भाविक मोठ्या संख्येने श्री क्षेत्र कोथळी येथे दाखल झाले .पहाटे काकडा भजनानंदात संत मुक्ताबाईची महापूजा , अभिषेक करण्यात आला . मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी पादूकांना मंगल अभिषेक व आरती केली. वारकरी भाविक भजन गात पावली खेळत तल्लीन झाले होते. मंदिर परिसरात केळीचे खांब ,आंब्याची तोरणे लावल्याने मंगलमय वातावरण तयार झाले होते. ठीक 11वा.नैवेद्य देवून महाआरती करण्यात आली. मुक्ताबाई मुक्ताबाई जयघोषात पादूका पालखीत ठेवून सोहळा मंदिर परिक्रमा करुन मार्गस्थ श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाला . यावेळी आमदार चंद्रकांत पाटील , खासदार रक्षाताई खडसे, रोहिणी खडसे, मध्यप्रदेश खंडवाचे खासदार ज्ञानेश्वर महाजन, म.प्र. च्या माजी मंत्री अर्चना चिटणीस, संदीप पाटील, पंजाबराव पाटील , पांडूरंग पाटील सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे , बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील , पंचायत समितीचे सभापती शुभांगी भोलाणे , विकास पाटील यु डी पाटील , जगदीश पाटील , सम्राट पाटील, व्यवस्थापक विनायकराव हरणे पाटील , उध्दव महाराज जुनारे , मुक्ताईनगरचे पंकज महाराज पाटील , नितीन महाराज, विशाल महाराज, विजय महाराज , रतिराम महाराज , वाल्मिक महाराज , अंबादास महाराज , विनोद सोनवणे, योगेश कोलते , सदा पाटील , पुजारी व्यवहारे आदी उपस्थित होते.
मुक्ताईनगर शहरात जल्लोषात स्वागत
मुक्ताईनगर शहरात पालखी सोहळ्याचे आगमन होताच ठिकठिकाणी फटाके उडवून सोहळ्याचे स्वागत करण्यात आले . शहरातून मिरवणुकीने जात असताना भाविकांना पाणी वाटप ठीकठिकाणी झाले. सोहळा नविन मुक्ताबाई मंदिरात दुपारी विसावा घेवून सातोड गावात येताच जल्लोषात स्वागत झाले . भावराव पाटील , शेषराव पाटील सातोड यांनी आदरातिथ्य केले . हा सोहळा ७०० किलोमीटरचा असून ३३ दिवसांचा प्रवास करुन हा सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी पोहोचेल .