
फलटण शहर व ग्रामीण भागातील सर्व समन्वयकांसाठी मंगळवार, दि. ७ एप्रिल रोजी अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमागील नेमक्या कारणाबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 6 एप्रिल : फलटण शहर आणि ग्रामीण भागातील सर्व समन्वयकांसाठी उद्या, मंगळवार दि. ७ एप्रिल रोजी संध्याकाळी ४:३० वाजता कोळकी येथील ‘अनंत मंगल कार्यालयात’ एका अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीला सर्वांनी जबाबदारीने उपस्थित राहण्याचे निरोप यंत्रणेमार्फत देण्यात आले आहेत.
अजितदादांच्या निधनानंतरची पहिलीच मोठी बैठक:
राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर श्रीमंत रामराजे यांनी बोलावलेली कार्यकर्त्यांची ही पहिलीच मोठी आणि महत्त्वाची बैठक आहे. आजच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या श्रीमंत रामराजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानपरिषदेचे सदस्य (आमदार) आहेत, तर त्यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण ‘राजे गट’ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सक्रिय आहे. या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक लक्षवेधी ठरणार आहे.
संजीवराजेंच्या नावाची चर्चा आणि रामराजेंचा संपणारा कार्यकाल:
पुढील वर्षी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा विधानपरिषदेचा कार्यकाल संपत आहे. त्यातच, आगामी काही दिवसांत संपन्न होणार्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. आगामी निवडणुका, उमेदवारी आणि राजकीय रणनीती यावर या बैठकीत खलबते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती स्वीकृत सदस्यांच्याबाबत खलबते ?:
सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी संपन्न झाल्या. त्यानंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी सुद्धा संपन्न झाल्या आहेत. यानंतर आता सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांच्या निवडीचे वेध लागलेले आहेत. याबाबत राजे गट काही निर्णय घेणार का ? याबाबत खलबते करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे का ? असे तर्क वितर्क सुद्धा आता लावले जात आहेत.
बैठकीचे नेमके कारण ‘गुलदस्त्यात’:
अजितदादांच्या निधनानंतरची बदललेली राजकीय परिस्थिती, राजे गटाची आगामी दिशा, की आणखी काही? नक्की ही बैठक का बोलावली गेली आहे, याचे अधिकृत कारण मात्र अद्याप ‘गुलदस्त्यात’ आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत श्रीमंत रामराजे कार्यकर्त्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार आणि कोणती राजकीय भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

