शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे रायगडावर उद्या शिवशंभू स्वराज्य मोहीमेचे आयोजन


स्थैर्य, सातारा, दि. 24 नोव्हेंबर : शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने शिवशंभूच्या जाज्वल्य स्वाभिमानी विचारांची रुजवणूक करण्यासाठी मंगळवार (ता. 25) आणि बुधवारी (ता. 26) दिवस हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे शिवशंभू स्वराज्य मोहीम आयोजिली आहे. त्यात पवित्र शिवशपथ घेण्यात येणार आहे.

शिवशंभू प्रतिष्ठाने याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की आधुनिक भारतात सामाजिक क्रांतीचे नवे पर्व म्हणून महात्मा जोतिबा फुले, लोकराजे राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याकडे पाहिले जाते. या महापुरुषांचे कार्य पाहिल्यास त्यांनीही वारकरी परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचा मूल्यविचार हाच आपल्या कार्याचा आधार मानल्याचे दिसून येते. म्हणूनच आपल्याला संतविचार, स्वराज्य आणि संविधान ही विचारांची कडी नीट समजावून घ्यावी लागेल.वारकरी परंपरेतील समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता हा विचार हाच स्वराज्याची पायाभरणीकरणारा पवित्र मूल्यविचार होता आणि याच मूल्यविचारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान रचले. देशातील सध्याची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक परिस्थिती पाहता इथल्या सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी, महिला, आदिवासी, भटके-विमुक्त, मागास समाजघटकांचे हक्क आणि अधिकार यांचे रक्षण करण्यासाठी संविधानाचीमूल्यव्यवस्था समजून घेत जनतेत रुजवणे आपले कर्तव्य आहे.त्यामुळेच संविधान दिनानिमित्त मंगळवार व बुधवारी किल्ले रायगड येथे जमून, रयतेच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे पहिले युवराज, महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करत स्वराज्याचा पाया असलेल्या संतविचारांचा जागर करणार आहे. समाजामध्ये शिवशंभूच्या जाज्वल्य स्वाभिमानी विचारांची रुजवणूक करण्यासाठी, पवित्र शिवशपथ घेणार आहोत. राज्यातील समस्त शिवशंभूप्रेमी, वारकरी, कीर्तनकार, संविधानप्रेमी, युवक-युवती, विद्यार्थी, विविध संघटना, पक्षांचे कार्यकर्ते व नागरिकांनी शिवशंभू स्वराज्य मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रनिर्माणात नव्या दमाने योगदान द्यावे, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.

असा होणार कार्यक्रम

मंगळवारी (ता. 25) दुपारी तीन वाजता चवदार तळे, क्रांतिभूमी महाड येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना जिजाऊ समाधी, पाचाड येथे सायंकाळी सहा वाजता मानवंदना, प्रबोधनपर कार्यक्रम, जेवण आणि मुक्काम. बुधवारी (ता. 26) सकाळी नऊ वाजता रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना वारकरी, सर्व जाती-धर्म, आदिवासी, भटके विमुक्त आणि स्त्रियांकडून मानवंदना, समतेचा काला व शिवशपथ.

शिवशंभू स्वराज्य मोहिमेत राज्यभरातून चार हजार 300 जणांनी नोंदणी केलेली आहे. मोहिमेत सात ते आठ हजार लोक सहभागी होणे अपेक्षित आहे. अपेक्षापूर्ती नक्कीच होईल, असा विश्वास संयोजकांना आहे.
– ह. भ.प डॉ. सुहास फडतरे महाराज (कुमठे, ता. कोरेगाव), कार्यकारिणी सदस्य, शिवशंभू प्रतिष्ठान


Back to top button
Don`t copy text!