दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२२ । शिरवळ । शिरवळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग (वॉर्ड) रचनेच्या आरक्षण सोडतीला अनुसूचित जातीच्या जागेवरून जोरदार गोंधळ निर्माण होत विशेष ग्रामसभेवर बहिष्कार व सभात्याग केल्याने जोरदार गोंधळ निर्माण झाला. यावेळी खंडाळा तालुका प्रशासनाने शिरवळ ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. यामध्ये प्रशासनाला आरक्षणाची चिट्ठी काढण्याकरिता शिरवळ ग्रामस्थांच्या जोरदार विरोधामुळे लहान मुलगा शोधताना नाकीनऊ आले. तथापि, आरक्षण जाहीर करण्यात यश आले. यामध्ये आरक्षणामुळे अनेकांची बत्ती गुल झाली आहे.
शिरवळ ग्रामपंचायतीच्या सहा प्रभाग (वॉर्ड)च्या १७ जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांच्या आदेशानुसार आरक्षण सोडत जाहीर करण्याकरिता शिरवळ येथील जय तुळजाभवानी मंगल कार्यालयामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्य्क पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, शिरवळ मंडलाधिकारी संतोष नाभर, शिरवळ तलाठी सागर शिंदे, शिरवळ ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे आदी उपस्थित होते.
यावेळी आरक्षण जाहीर करण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या परिपत्रकाप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर करताच शिरवळ सरपंचपदासाठी आरक्षित असलेल्या अनुसूचित जातीच्या २ जागा ह्या चक्राकार पद्धतीने वॉर्ड क्रं.५ ऐवजी पुढील वॉर्डमध्ये लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे जाणार असल्याचे जाहीर करताच यावेळी ग्रामसभेमध्ये जोरदार गोंधळ उडाला. यावेळी शिरवळ ग्रामस्थांनी प्रशासनाकडून अनुसूचित जातीच्या वॉर्डवाईज करण्यात आलेल्या पाहणी अहवालावरच जोरदार आक्षेप घेत सदरील पाहणी अहवाल पुन्हा प्रशासनाने करावा तोपर्यंत आरक्षण जाहीर करू नये अशी जोरदार मागणी केली. दरम्यान, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांनी शिरवळ ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतू, ग्रामस्थांनी अचानकपणे विशेष ग्रामसभेवर बहिष्कार घालण्याचा व सभात्याग करण्याचा निर्णय जाहीर केल्याने जोरदार गोंधळ उडाला. यावेळी प्रशासनाकडून वॉर्डाचे आरक्षण जारी करण्यात आले. यावेळी शिरवळ पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी १७ प्रभाग (वॉर्ड)चे आरक्षण खालीलप्रमाणे -शिरवळ ग्रामपंचायत प्रभाग (वार्ड) रचना
आरक्षण….! – वार्ड क्रं. 1 – आरक्षण 3 सदस्य संख्या 1) अनुसूचित जाती महिला प्रवर्ग – 1 सदस्य संख्या, 2) सर्वसाधारण महिला प्रवर्ग – 1 सदस्य संख्या, 3) खुला प्रवर्ग – 1 सदस्य संख्या, वार्ड क्रं. 2 – आरक्षण 3 सदस्य संख्या, 1) अनुसूचित जाती खुला प्रवर्ग -1 सदस्य संख्या, ,2) सर्वसाधारण महिला प्रवर्ग -1 सदस्य संख्या, 3) खुला प्रवर्ग – 1 सदस्य संख्या, , वार्ड क्रं. 3 – आरक्षण 2 सदस्य संख्या, 1) सर्वसाधारण महिला प्रवर्ग – 1 सदस्य संख्या, ,2) खुला प्रवर्ग – 1 सदस्य संख्या, ,वार्ड क्रं – 4 – आरक्षण 3 सदस्य संख्या, 1) सर्वसाधारण महिला प्रवर्ग – 2 सदस्य संख्या, 2) खुला प्रवर्ग – 1 सदस्य संख्या, ,वार्ड क्रं.5- आरक्षण 3 सदस्य संख्या, 1) सर्वसाधारण महिला प्रवर्ग – 2 सदस्य संख्या, ,2) खुला प्रवर्ग – 1 सदस्य संख्या, ,वार्ड क्रं – 6 -आरक्षण 3 सदस्य संख्या, 1) सर्वसाधारण महिला प्रवर्ग – 1 सदस्य संख्या, , 2) खुला प्रवर्ग – 2 सदस्य संख्या अशी १७ सदस्य सांख्येचे आरक्षण जाहीर करण्यात आले.