दैनिक स्थैर्य । दि.२१ जानेवारी २०२२ । मुंबई । शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.७६ टक्के कर्ज रोखे २०२२ अदत्त शिल्लक रकमेची २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत देय असलेल्या व्याजासह २२ फेब्रुवारी २०२२ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे. संबंधित कर्जावर २२ फेब्रुवारी २०२२ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.
रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी रोख्यांचा मूळ वर्गणीदार यथास्थिती उत्तरवर्धीधारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे व्याज प्रदान करण्यासाठी मुख्यांकित करण्यात आली असल्यास त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.
निधी नियत दिनांकांस परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी ८.७६ टक्के कर्जरोखे धारकांनी लोकऋण कार्यालयात २० दिवस अगोदर रोखे सादर करावीत.
भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकेच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते ते रोखे प्रमाणपत्राच्या स्वरूपात संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत. रोख्यांची रक्कम सादर करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित केली आहे तेथे किंवा त्या व्यतिरिक्त रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात पाठवावेत. लोकऋण कार्यालय हे शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात किंवा उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करण्यात येईल, असे वित्त विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे.