स्थैर्य, फलटण दि. ३ : फलटण शहरातील शुक्रवार तालीम, रविवार तालीम, बारस्कर तालीम या शताब्दी पूर्ण करणार्या तालीम मंडळांनी सतत कुस्ती व अन्य देशी खेळांना प्राधान्य देवून नव्या पिढीच्या आरोग्यासाठी विशेष दक्षता घेतली असून त्यातून सक्षम, सुदृढ, सशक्त पिढी घडविल्याचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.
शुक्रवार तालमीचे नूतनीकरण, नव्याने वस्ताद नियुक्त करुन तरुणांना कुस्तीसाठी प्रवृत्त करणे, नगर परिषदेच्या माध्यमातून तालीम इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, आखाड्याची सुधारणा आदी कामांचा शुभारंभ महाराष्ट्र केसरी पै. गोरख सरक यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला. त्यावेळी माजी नगराध्यक्ष सुदामराव मांढरे, माजी उपनगराध्यक्ष संजय पालकर, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगसेवक चंद्रकांत शिंदे, विकास राऊत, सुनील मठपती, फिरोज आतार, प्रीतम उर्फ आबा बेंद्रे, पै. शंभूराज बोबडे, सागर शहा, राहुल शहा, शरद मठपती, निलेश खानविलकर, निलेश चिंचकर, योगेश शिंदे, सनी पवार, अभिजीत जानकर, संग्राम निंबाळकर, भास्कर ढेकळे, अरुण सुळ, गणेश पालकर, विजय पालकर यांच्यासह शहरातील तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुक्रवार तालीम, रविवार तालीम, बारस्कर तालीम मंडळासह शहरातील विविध तरुण मंडळे, गणेशोत्सव मंडळांनी या शहराला लाभलेला सांस्कृतिक, ऐतिहासिक, देशी खेळाचा वारसा सतत वृद्धिंगत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून दर्जेदार गणेशोत्सव आणि देखण्या गणेश विसर्जन मिरवणूका काढून त्या माध्यमातून फलटण करांना येथील ऐतिहासिक वारसा, संस्कृती, देशी खेळाची परंपरा याचे दर्शन घडविले असल्याचे निदर्शनास आणून देत नव्या पिढीने या सर्वांची जपणूक किंबहुना त्यामध्ये वाढ केली पाहिजे त्यासाठी शहरातील तालीम मंडळांच्या माध्यमातून जुन्या जाणत्या मंडळींचे सहकार्य व मार्गदर्शन उपयुक्त ठरत असल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.
सुदामराव मांढरे यांनी स्व. माजी आमदार चिमणराव कदम, विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या तालमीच्या विकासासाठी बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे नमूद करीत तालमीची परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करीत सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
चंद्रकांत शिंदे यांनी येथे व्यायामासाठी, कुस्ती शिकण्यासाठी शहरातील सर्व तरुणांना संधी असेल मात्र येथे असलेले नियम, शिस्त सर्वांवर बंधनकारक असेल याची आठवण करुन दिली. येथे येणार्या कोणत्याही तरुणाला एक रुपया खर्च करावा लागणार नाही, येथील साधने, सुविधा, व्यवस्था, वस्ताद यांचे मानधन याची संपूर्ण व्यवस्था मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत असून तरुणांनी या सर्वाचा लाभ घेऊन सुदृढ, सशक्त शरीर प्रकृती अधिक मजबुत करावी, कुस्ती मध्ये प्राविण्य मिळवावे असे आवाहन केले.
विकास राऊत, गणेश पालकर यांनी येथे केवळ देशी खेळ व कुस्तीला प्राधान्य राहील याची नोंद घेऊन त्याशिवाय अन्य व्यायाम प्रकार आणि बेशिस्त वर्तन येथे खपवून घेतले जाणार नाही हे स्पष्ट करतानाच कुस्तीची आवड व त्यामध्ये प्रशिक्षीत होण्याची ईच्छा असणार्या तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर राहुल निंबाळकर यांनी प्रास्ताविकात तालीम पुनरुज्जीवन योजनेविषयी माहिती दिली.