विकास कामांसाठी मंजूर निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करा – पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सूचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सांगली, दि.२५ : जिल्हा नियोजन समितीमधून विकास कामांसाठी मंजूर निधी त्या त्या योजनांवर 31 मार्चपूर्वी खर्च करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज आढावा बैठकीत दिल्या.

जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात येणाऱ्या विकास कामांचा आढावा, विकास कामांवर झालेला खर्च, उर्वरित निधी, मंजूर कामे याबाबतचा आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शासन निकषानुसार विकास कामे गतीने आणि मुदतीत पूर्ण होण्यासाठी यंत्रणांनी दक्षता घ्यावी. मंजूर निधी परत जाणार नाही याबाबत नियोजन करावे. तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता तातडीने घेण्यात याव्यात, अशा सूचना बैठकीत त्यांनी दिल्या. किल्लेमच्छिंद्रगडवर जाणारा रस्ता सिमेंट क्राँकिटचा व्हावा. याबाबत संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करावा. दिव्यांगांसाठी देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरावर कॅम्प आयोजनाबाबत आरोग्य विभागाने नियोजन करावे.

जिल्हा नियोजन समितीमधून सन 2021-2022 मध्ये प्रस्तावित विकास कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. यंत्रणांनी हे प्रस्ताव सादर करताना I Pass प्रणालीतून सादर करावेत, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोना रूग्ण, उपाययोजनांचा आढावाही घेतला.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम, वनविभाग, जलसंपदा, क्रीडा, लघुपाटबंधारे, विद्युत, रेशीम, तीर्थक्षेत्र, अंगणवाडी बांधकाम, उद्योजकता विकास, पाणंद रस्ते, पर्यटन, नगरोत्थान, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, नगरविकास, सामान्य सेवा आदी विविध विभागांकडील विषयांचा आढावा घेण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!