दैनिक स्थैर्य । दि. ०४ जून २०२२ । सातारा । ABP माझाचे प्रतिनिधी पत्रकार राहुल तपासे यांच्यावर हल्ला करणाऱ्या नीच प्रवृतींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भुईंज प्रेस क्लबतर्फे करण्यात आली असून या भ्याड हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करून हल्लेखोरांचा निषेध केला आहे.
याबाबत भुईंज प्रेस क्लबतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पत्रकार राहुल तपासे हे परखड, समाजशील पत्रकारितेसाठी जगभरातील मराठी भाषिकांमध्ये परिचित आहेत. पत्रकारिता हे जेवढे अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे माध्यम आहे तितकेच ते अनेक सकारात्मक गोष्टींना बळ देण्याचे व्यासपीठ आहे, हे त्यांनी कितीतरी वार्तांकनातून सिद्ध केले आहे. या आमच्या तरुण मित्राने अत्यंत कष्टातून वाटचाल करत निस्पृह, प्रामाणिक, चारित्र्यवान पत्रकारिता केली आहे. त्यामुळे या मित्रावर झालेला हल्ला अत्यंत संतापजनक आहे. आम्ही संविधानाला मानतो अन्यथा या हल्लेखोरांचा समाचार आम्हीच घेतला असता, त्यासाठी किंचितसा वेळ लागला नसता. त्यामुळेच कायद्याने आपले काम चोख बजावत तपासे हे पोलीस मित्र पुरस्कार प्राप्त आहेत (हा पुरस्कार ३५ हजार रुपये देऊन मिळवलेला नाही ) याची जाणीव ठेवून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. याबाबत पोलीस दल हयगय करणार नाही असा विश्वास आहे. त्यामुळे आमचा हा विश्वास सार्थ ठरवत कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करताना संबंधित हल्लेखोरांवर पत्रकार हल्ला विरोधी कायदानुसार कारवाई करावी, अशीही मागणी भुईंज प्रेस क्लबतर्फे केली आहे.
या निवेदनावर अध्यक्ष राहुल तांबोळी, उपाध्यक्ष कृष्णात घाडगे, संस्थापक जयवंत पिसाळ, महेंद्रआबा जाधव, वाई तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विलास साळुंखे, तालुका उपाध्यक्ष किशोर रोकडे, पांडुरंग मरे, विनोद भोसले, जितेंद्र वारागडे, अशोक इथापे, हेमंत बाबर, संजय माटे, सचिन इथापे, किरण घाडगे आदींच्या सह्या आहेत