दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
सन २०२४ च्या गणेशोत्सवात सहभागी होणार्या राज्यातील रजिस्टर असलेल्या व मान्यता घेतलेल्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेतील राज्यातील पहिल्या ३ विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुढीलप्रमाणे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल.
- प्रथम क्रमांक – रु. ५.०० लक्ष
- द्वितीय क्रमांक -रु. २.५ लक्ष
- तृतीय क्रमांक – रु. १.०० लक्ष
तसेच राज्यस्तरीय निवड समितीकडे जिल्हास्तरीय निवड समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरीलप्रमाणे ३ विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी रु.२५,०००/- चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सदर स्पर्धेत, धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येणार आहे.
सदर स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या कार्याबाबतचा कालावधी हा सन २०२३ च्या अनंत चतुदर्शी ते सन २०२४ च्या गणेश चतुदर्शी पर्यंतचा असेल.
सदर गणेशोत्सव स्पर्धेअंतर्गत भाग घेणार्या मंडळांपैकी मागील सलग २ वर्षे राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. सदरची अट इतर मंडळांना संधी देण्याच्या उददेशाने नमूद करण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या इमेलवर सदर स्पर्धेचे परिपूर्ण अर्ज दि.०१.०८.२०२४ ते दि.३१.०८.२०२४ पूर्वी सादर करावेत.
या स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समिती असणार आहे.
जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ अशा ४४ सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे राज्यस्तरीय निवड समितीकडे पाठवतील.
सदर दोन्ही समितींसाठी संचालक, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी हे समन्वयक असतील.
राज्यस्तरीय निवड समिती ही जिल्हास्तरीय निवड समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४४ प्राप्त शिफारशीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गुणांकन व संबंधित कागदपत्राच्या आधारे पहिल्या ३ विजेत्यांची निवड करतील व त्यांचा अहवाल संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्याकडे सादर करतील.
या स्पर्धेसाठी संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मंडळांनी अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.