
दैनिक स्थैर्य | दि. २६ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा… सुंदर शाळा’ उपक्रमात फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण या प्रशालेने फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या योजनेत शाळेला ३ लाख रूपयांचे बक्षीस मिळणार आहे.
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत ‘मुख्यमंत्री माझी शाळा.. सुंदर शाळा’ हा उपक्रम यावर्षीपासून राबविण्यात आला आहे. शिक्षण विभागतील जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील मूल्यांकन समितीने नुकतीच तालुक्यातील अनेक शाळांची पाहणी केली. शाळेतील उपक्रमशीलता व गुणवत्ता याबाबत मूल्यांकन समितीने मूल्यमापन केले. त्याचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. खाजगी व्यवस्थापन गटातून फलटण तालुकास्तरावर मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटणने प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे. त्यासाठी शाळेला शासनातर्फे ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
यापूर्वीही राज्य पातळीवर शाळेची ‘महाराष्ट्र समाजभूषण स्मार्ट स्कूल’ पुरस्कार व ‘संत सोपानकाका स्वच्छ सुंदर शाळा.. उत्तम दर्जाची शाळा’ म्हणून निवड झालेली आहे. स्पर्धा परीक्षेतील उत्तम कामगीरीबद्दल दिला जाणारा ‘स्मार्ट शाळा व उपक्रमशील शाळा’ त्याबरोबरच ‘राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार’ सन्मान झालेला आहे. शाळेच्या सर्वांगीण दर्जात्मक प्रगतीसाठी प्राचार्य श्री. बाबासाहेब गंगवणे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेळोवेळी विशेष परिश्रम घेतले.
या निवडीबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, तालुक्याचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी फलटण डायटच्या सौ. कुंभार, फलटण एज्युकेशन सोसायाटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, माता -पालक संघाचे प्रतिनिधी यांनी प्रशालेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रशालेचे प्राचार्य व शिक्षकवृंद यांचे अभिनंदन केले.