दैनिक स्थैर्य | दि. २५ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास या घोषवाक्याखाली राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२३-२४ राजुरी, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. २३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सदरील शिबिराच्या दुसर्या दिवशी ‘माती परीक्षण ही काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
प्रास्ताविक करताना पार्श्वभूमी, माती परीक्षण उपक्रम व मार्गदर्शकांची ओळख याबद्दल सविस्तर माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश बिचुकले यांनी दिली. या कार्यक्रमाला राजुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. विनोद घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील मृदा शास्त्र व कृषि रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता खरात मेटकरी यांनी माती परीक्षणाची पद्धत, फायदे, जमीन मृदा पत्रिका, जमिनीचे आरोग्य संवर्धन, सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन, ‘माती परीक्षण ही काळाची गरज’ या विषयावर सर्व उपस्थितांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व राजुरी गावचे विद्यमान सरपंच श्री. शिवाजी पवार यांनी राजुरी गावातील सर्व शेतकर्यांनी माती परीक्षणाचे महत्त्व समजून घेऊन माती व पाणी परीक्षण करून घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.
या कार्यक्रमास राजुरी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला, युवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे व स्वयंसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन कुमारी वर्षा खराडे व आभार कुमार प्रणव इंगवले यांनी मानले.