’माझी झेडपी, माझा अधिकार’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । पुणे । जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांविषयी नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ‘माझी झेडपी माझा अधिकार’ या नागरिक अभिप्राय प्रणालीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकताच शुभारंभ करण्यात आला.

या प्रणालीचा सामान्य नागरिकांना प्रतिक्रीया किंवा सूचना देण्यासाठी उपयोग करता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या punezp.mkcl.org या संकेतस्थळावर ‘विशेष मोहिम’ शिर्षकाखाली ‘जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी महालाभार्थी’ पर्यायावर क्लिक करायचे आहे. जिल्हा परिषद महालाभार्थीमध्ये आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करावी लागेल. नोंदणी केलेल्या नागरिकांनाच या प्रणालीचा उपयोग करता येईल. नोंदणी केल्यानंतर ‘माझी झेडपी माझा अधिकार’ या पर्यायावर क्लिक करून सदर प्रणालीचा वापर करता येणार आहे.

या प्रणालीद्वारे नागरिकांना आपला तालुका व गाव निवडता येणार आहे. गावाची निवड केल्यावर त्या गावातील कामांची यादी आपल्या समोर येतील. एखाद्या कामाविषयी प्रतिक्रीया देऊन छायाचित्रही अपलोड करता येणार आहे. या कामाला गुणांकनही देता येणार आहे. त्यानुसार काम चांगले आहे किंवा सुधारणेला वाव आहे हे कळू शकणार आहे.

सार्वजनिक कामाचे सामाजिक लेखापरीक्षण आणि कामाचा अभिप्राय प्राप्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी दिलेल्या गुणांकन अर्थात स्टार रेटींगच्या आधारे जिल्हा परिषदेने राबविलेल्या कामांचे मूल्यमापन करता येणार आहे.

पारदर्शक आणि प्रगतीशील प्रशासनात नागरिकांचा सहभाग महत्वाचा असतो. हा सहभाग घेऊन जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामांचा दर्जा चांगला रहावा आणि त्याबाबत त्यांचीच मते विचारात घेतली जावी यादृष्टीने तयार करण्यात आलेली ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे


Back to top button
Don`t copy text!