दैनिक स्थैर्य । दि. ०४ जून २०२२ । सातारा । देशातील महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आत्ताचे केंद्रातील सरकार सर्वांनाच मूर्खात काढत आहे. यामुळेच या देशात महिलांनीच आता पुढे होऊन संघर्ष पुकारून आगामी निवडणुकीतून केंद्रातील भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ द्यायचे नाही असा निर्धार करावा, असे आवाहन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा कॉ सुधा सुंदरामन यांनी केले आहे.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे बारावे महाराष्ट्र राज्य अधिवेशन सातारा येथील वेदभवन मंगल कार्यालयात उभारण्यात आलेल्या कमल वानले नगरातील उषा दातार सभाग्रहात आज पासून सुरू झाले. जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. सुधा सुंदरामन उद्घाटक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जनवादी च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा कॉ नसिमा शेख होत्या. यावेळी विचार मंचावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या माजी खासदार वृंदा करात , स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अशोक भोईटे , राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे , संघटनेच्या राज्य सेक्रेटरी प्राची हातिवलेकर अंगणवाडी संघटनेच्या नेत्या कॉम्रेड शुभा शमीम , कॉ उदय नारकर , कॉ. एम ए शेख , सुटाचे प्रा डॉ आर के चव्हाण , विजय मांडके , माणिक अवघडे , वसंतराव नलावडे , मिनाज सय्यद उपस्थित होते.
महिलांच्या प्रश्नावर जनवादी महिला संघर्ष करीत आहेत. विषमतेवर आधारलेली शोषणव्यवस्था बदलण्यासाठी जनवादी महिला संघटना आग्रही आहे. पुरुषसत्ता आणि भांडवलदारी सत्ता तसेच जातीयवाद यांचे आव्हान आपल्यापुढे आहे .ते आव्हान स्वीकारून आपण त्याविरोधात एल्गार पुकारत आहोत असेही सुधा सुंदरामन यांनी सांगितले.
भाजपची प्रवृत्ती येथील सर्वांनाबरोबर घेऊन जाण्याच्या तसेच भाईचाऱ्याच्या संस्कृतीवर घाला घालीत आहे.हल्ला करीत आहे. त्याविरोधात आपली विचारधारा आहे. त्यास अधिक मजबूत करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी खासदार वृंदा करात यांनी या वेळी बोलताना केले. प्रारंभी संघटनेचा ध्वज उभारून आणि महिलांच्या संघर्ष व आंदोलनात ज्यांचे निधन झाले अशा नेत्यांना व कार्यकर्त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ अशोक भोईटे ,कॉ उदय नारकर कॉ शुभा शमीम ,कॉ .एम ए शेख , आदींची भाषणे झाली.
सभेच्या अध्यक्षा जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉम्रेड नसीम शेख यांचेही यावेळी अध्यक्षीय भाषण झाले. सूत्रसंचालन जनवादी च्या महाराष्ट्राच्या सरचिटणीस प्राची हातिवलेकर यांनी केले. आभार आनंदी अवघडे यांनी मानले. राज्यभरातून या अधिवेशनासाठी महिला प्रतिनिधी उपस्थित आहेत.