
दैनिक स्थैर्य । 30 जून 2025 । फलटण ।
जाऊं देवाचिया गांवां ।
देव देईन विसांवा ॥
देवा सांगों सुख दुःख ।
देव निवारील भूक ॥
घालूं देवासी च भार।
देव सुखाचा सागर ॥
राहों जवळी देवापाशीं ।
आतां जडोनि पायांसी ॥
तुका ह्मणे आह्मी बाळें ।
या देवाचीं लडिवाळें ॥
या संतवाणीप्रमाणे पंढरीच्या विठुरायाला आपली सुख दुःख सांगण्यासाठी माऊलींच्या समवेत निघालेला वैष्णवांचा सागर आध्यात्मिक व ऐतिहासिक अशा फलटण नगरीतील मुक्कामानंतर फलटणचा निरोप घेऊन बरड येथील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला.
ऐतिहासिक फलटण नगरीत पहुडलेल्या वैष्णवांच्या सागराला पहाटे जाग आली प्रस्थानाची लगबग सुरू झाली माऊलींना जागे करण्यात आले.
उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा ।
झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा ॥
या अभंग उक्तीप्रमाणे वारकरी राजाला पहाटे जाग आली. फलटण नगरीतील पालखीतळावर माऊलींची विधिवत पूजा करण्यात आली. माऊलींचा पालखी सोहळा फलटणच्या पालखीतळावरून मार्गस्थ झाला. हा सोहळा शहरातील पालखी मार्गावरून श्रीराम कारखानापर्यंत पोहोचला. दरम्यान शहरवासीयांनी माऊलींचे दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी माऊलींना निरोप दिला.
विडणी येथे सकाळच्या पहिल्या विसाव्यासाठी पालखी सोहळा जात असताना पंढरपूर रस्त्यावरील फलटण हद्दीतील ओढा ओलांडताच रस्त्याच्या दुतर्फा असणारी विविध प्रकारची गर्द झाडे मार्गक्रमण करणार्या लाखो वारकर्यांना आत्मिक समाधान देत होती. सकाळच्या न्याहारीसाठी पालखी सोहळा विडणी येथे थांबला. दरम्यान, विडणी पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळी विडणी ग्रामपंचायत व अन्य संस्थांच्यावतीने सोहळ्याचे स्वागत करून पालखी सोहळ्यातील विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. विडणी गावाच्या प्रवेशद्वाराजवळील ओठ्यावर काही वेळ पालखी विसाव्यासाठी ठेवण्यात आली होती, यावेळी माऊलींची आरती करण्यात आली. माऊलींच्या दर्शनासाठी विडणी पंचक्रोशीतील माऊली भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र होते.
न्याहरी आटोपून पालखी सोहळा पिंपरदकडे मार्गस्थ झाला पिंपरदवासियांनी पालखी सोहळ्याचे मनोभावे स्वागत केले. विठ्ठल नामाचा गजर करीत पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी पिंपरद येथे थांबला, यावेळी माऊली सेवेकरांच्यावतीने पादुकांना पंचामृतांनी अभिषेक घालण्यात आला. माऊलींची सेवा करण्याचा हा मान असल्याचे वारकरी संप्रदाय सांगतात.
हे स्वामी राजा बसा भोजनाला ।
हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ।
पुरणाची पोळी तुम्हा आवडीची ।
लाडू करंजी असे ही खव्याची ।
डाळींब द्राक्षे फळे आणि मेवा ।
केशरी दूध घ्या स्वामीदेवा ।
पुढे हात केला या लेकराने ।
प्रसाद द्यावा आपुल्या कराने ।
अशा प्रकारचे श्लोक म्हणत पिंपरदच्या शिवारात विसावलेल्या सोहळ्यातील वैष्णव व भक्तांच्या भोजनाच्या पंक्ती चालू होत्या. हजारो पंगती उठत होत्या. अन्य भाविकांनी आणलेला प्रसादही वारकरी आवडीने खात होते. भोजनात अवघा वैष्णवजन दंग झाला होता. पिंपरद येथील दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा मजल दरमजल करीत वाजेगाव नाक्यावर आला यावेळी या परिसरातील नागरिकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
बरडकारांच्यावतीने माऊलींचे जंगी स्वागत
वाजेगाववरून पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील अखेरच्या मुक्कामासाठी म्हणजे बरडगावी पोहोचला. बरड गावच्या वेशीवर पालखी सोहळ्याचे ग्रामपंचायतच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर पालखी सोहळा बरड गावातील पालखीतळावर विसावला. बरड येथील मुक्कामानंतर ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दि. 30 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत मार्गस्थ होणार आहे.