फलटण मध्ये दहशत व लूटमारीच्या प्रकाराचा निषेध; कठोर कारवाईची मागणी : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 26 सप्टेंबर 2023 | फलटण | फलटण हे शांतता प्रिय शहर असून इथला व्यापारी वर्ग पिढ्यान् पिढ्या प्रामाणिकपणे व निष्ठेने आपला व्यवसाय करण्यात माहिर आहे. अशा परिस्थितीत कोणी भर बाजार पेठेत दहशत माजवून व्यापाऱ्यांना धमकावण्याचा, लुटण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते कदापिही खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. फलटण शहर व तालुक्यात अशा प्रकारे दहशत माजविणे, धमकावणे, लुटालूट करण्याचे प्रकार केल्यास तो कोणीही असो पोलिस प्रशासनाने त्याची योग्य दखल घेऊन त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी करताना असे कृत्य करणारा कोणत्याही राजकीय पक्षाचा, गट तटाचा अथवा कितीही लहान मोठा असेल तर त्याची अजिबात गय केली जाणार नसल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

फलटण शहरात भर बाजार पेठेत, दिवसा आणि आठवडा बाजार दिवशी घडलेला प्रकार, कोयता गँग म्हणून केलेला निद्य प्रकाराचा आपण स्वतः आणि आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ.दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे स्पष्ट करीत यापुढे फलटण शहर व तालुक्यात असे निंदनीय प्रकार करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्या विरुद्ध ठोस कारवाई साठी आपण स्वतः सर्वप्रथम त्याचा निषेध करुन ठोस कारवाई होईपर्यंत शांत बसणार नसल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

फलटण शहरातील व्यापारी व अन्य कोणत्याही समाज घटकांवर यापुढे अशा प्रकारांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आश्वासन देताना दुर्दैवाने असा प्रकार घडला तर आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ.दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि आपण स्वतः सदर व्यक्ती व समाज घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!