‘असे झाले असते तर बरे झाले असते’ । हे म्हणणे नाही खरे ॥
जे होणे योग्य ते घडले । व ते रामइच्छेनेच घडले ॥
परमात्म्यानेच जी इच्छा केली । त्याचे आड नाही कोणी आले ।
हा ठेविता विश्वास । मनाला धीर वाटेल खास ॥
माझे सर्व कर्माचा गुरूच सूत्रधार । सर्व सत्ता गुरूचे हाती । तेथे न चाले कोणाची गति ॥
आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती । तेथे बाकीच्या गोष्टींची काय मिति ? ॥
परिस्थिति कोणाचीही । कितीही असली भली किंवा बुरी । तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी ॥
न पडावे अभिमानाला बळी । रामइच्छा जाणावी सगळी ॥
हा जरी असेल सिद्धांत । तरी जपून वागावे व्यवहारात ॥
आपला व्यवहार, परमार्थ, घडतो । तो सर्व त्याचे इच्छेने चालतो ॥
म्हणून, होणे जाणे भगवंताच्या हाती । आपण त्याला जावे शरणागति ॥
चित्तांत ज्याच्या राहिले समाधान । तोच भगवंताचा आवडता जाण ॥
ज्याचा विश्वास रामावरी । त्याला समाधान स्वीकारी ॥
माझे हित रामाचे हाती । हा धरिता विश्वास । समाधान मिळत असे जीवास ॥
आपण होऊन रामाचे जाण । सदा राखावे समाधान ॥
मी-माझे करावे रामार्पण । तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण ॥
आस ठेवावी रामापायी । आनंदी समाधानी राही ॥
अंतरी समाधान । हेच आपले साधन जाण ॥
संसारात न पाहावे उणे पुरे । ठेवावे त्यात समाधान खरे ॥
जशी जशी ज्या वेळी परिस्थिति । तशी तशी असावी समाधान वृत्ति ॥
ज्या स्थितीत ठेवील राम । त्यात राखावे समाधान ॥
चिंता, अहंता, ममता, कोणी कारणावांचून । केले छळ, कपट अपमान ।
अथवा बोलिले शब्दबाण । त्यात राखावे समाधान ॥
समाधान देणे नाही दुसर्याचे हाती । ईश्वरकृपेनेच त्याची प्राप्ति ॥
जोवर संशयी झाले मन । तोवर न होई समाधान ॥
विषयास घातले खत जाण । तरी कसे पावावे समाधान ? ॥
जोवर दृश्याचे भान । तोवरी मनी न राहे समाधान ॥
समाधानाची स्थिति । उपाधीरहित असावी वृत्ति ॥
कोठे ठेवावे मन । जेणे मिळेल समाधान ? ॥
समाधान नव्हे देहाचा गुण । मनाने व्हावे भगवंताचे आपण ॥
पांडव झाले वनवासी । पण अखंड राहिले भगवंतापाशी ॥
पांडव भगवंताचे भक्त झाले । वनवास नाही चुकविता आले ।
त्यांनी केले भगवंताचे स्मरण । जेणे राखिले समाधान ॥
‘आता झालो मी रामाचा’ । हा विचार ठेवावा साचा ॥
ऐसे होऊन राही । समाधान तेथेच पाही ॥