पाचगणीतील 42 निवासी शाळांत गॅस टंचाई

भोजन व्यवस्थेचे नियोजन कोलमडले; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रश्न


स्थैर्य, 14 मार्च, सातारा :पाचगणी शहरात सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, याचा सर्वाधिक फटका येथील नामांकित निवासी शाळांना बसत आहे. काही दिवसांपासून गॅस पुरवठा विस्कळित झाल्याने 42 निवासी शाळांमधील सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेचे नियोजन कोलमडले आहे. विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची सोय करताना शाळा प्रशासनाची दमछाक होत असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

वेळेवर पुरवठा होत नसल्याने अनेक शाळांना अक्षरशः ’वेटिंग’वर राहावे लागत आहे. दररोज शेकडो विद्यार्थ्यांसाठी नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण तयार करताना मोठ्या इंधनाची गरज भासते. व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणी मर्यादित स्वरूपात जेवण बनवावे लागत आहे, तर कुठे पर्यायी
व्यवस्था शोधताना दमछाक होत आहे.वास्तविक पाहता, पाचगणीचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर येथील निवासी शाळा आणि पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीत होणारे अडथळे या क्षेत्राला खीळ घालत आहेत. गॅस टंचाईमुळे केवळ जेवण उशिरा मिळणे इतकाच हा प्रश्न मर्यादित नसून, यामुळे अभ्यासाच्या वेळापत्रकावरही परिणाम होत आहे.

परीक्षा काळात वेळेवर सकस आहार मिळणे आवश्यक असताना, शाळा प्रशासनाला गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी चकरा माराव्या लाग आहेत. पाचगणीच्या निवासी शाळांची शिस्त आणि उत्कृष्ट सोयीसुविधांसाठी जगभरात ख्याती आहे. मात्र, जर मूलभूत गरजांसाठीही शाळांना झगडावे लागत असेल, तर त्याचा नकारात्मक संदेश पालकांपर्यंत जाण्याची भीती आहे. निवासी शाळा हे काही निव्वळ व्यावसायिक हॉटेल नसून ती विद्यार्थ्यांची घरे आहेत, याचे भान ठेवून प्रशासनाने या संस्थांना ’प्राधान्य गट’ म्हणून नियमित गॅस पुरवठा करण्याची गरज व्यक्त होत आहे. स्थानिक गॅस वितरकांनीही पुरवठा साखळीतील त्रुटी दूर करून निवासी शाळांचा कोटा निश्चित करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

पाचगणीमध्ये देशाच्या कानाकोपर्‍यातून आणि परदेशातूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करणे ही निवासी शाळांचीजबाबदारी असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा कमालीचा विस्कळित झाला आहे. गॅस एजन्सीकडे वारंवार मागणी नोंदवूनही गॅस टंचाईमुळे शाळा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे सध्या परीक्षा सुरू असल्याने शिक्षक परीक्षेच्या कामात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची जेवण व्यवस्था सुरळीत ठेवणे कठीण होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून निवासी शाळांना व्यावसायिक गॅस सिलिंडरचा नियमित पुरवठा करावा.

– अमर बिरामणे, अध्यक्ष, नचिकेताज हायस्कूल, पाचगणी.


Back to top button
Don`t copy text!